‘एल्फिन्स्टन’ दुर्घटनेतील जखमींचे समुपदेशन

रोजच्याच वाटेवरील पुलावर अचानक झालेला कोलाहल आणि त्या चेंगराचेंगरीत प्रत्यक्ष मृत्यूचे झालेले ओझरते दर्शन यामुळे ‘एल्फिन्स्टन’ पुलावरील चेंगराचेंगरीतील ३८ जखमी मनाने पुरते हादरून गेले आहेत. जिन्यावरील धक्काबुक्कीत झालेल्या जखमा येत्या काही आठवडय़ांत पूर्णपणे बऱ्या होतील. परंतु, त्या दुर्घटनेतून पुन्हा उभं राहण्यासाठी यातील अनेकांना बरेच मानसिक प्रयास करावे लागणार आहेत. त्यामुळेच केईएम रुग्णालयाच्या मानसोपचार विभागाने या जखमी प्रवाशांचे समुपदेशन करण्यास सुरुवात केली आहे.

युद्ध, बॉम्बस्फोट, अपघात यामध्ये बचावलेल्या व्यक्तींवर मोठा मानसिक आघात होत असतो. शुक्रवारी एल्फिन्स्टन पुलावरील झालेल्या चेंगराचेंगरीतील प्रसंगही तसाच जीवघेणा होता. या दुर्घटनेत २३ प्रवाशांचा जीव गेला. परंतु, ३८ जखमींपैकी अनेकांनी मृत्यू डोळय़ांनी पाहिला. त्यामुळे जीव वाचल्यानंतरही त्या घटनेचे दडपण आजही त्यांच्या मनावर आहे. यातील अनेक रुग्णांना रात्रीची झोप   येईनाशी झाली आहे, तर काहींच्या डोळय़ांसमोरून तो प्रसंगच जाईनासा झाला आहे. या सर्वामुळे या जखमी प्रवाशांचा आत्मविश्वासच मोडून पडला आहे. अशा अवस्थेत या रुग्णांना मानसिक आधार देण्यासाठी केईएम रुग्णालयाच्या मानसोपचार विभागाने सोमवारपासून जखमी रुग्णांचे समुपदेशन सत्र सुरू केले आहे. पहिल्या टप्प्यात (सपोर्टिव्ह सायको थेरेपी)  रुग्णालयातील मानसोपचारतज्ज्ञ रुग्णांशी संवाद साधतील. या रुग्णांच्या मनात झालेल्या दुर्घटनेबद्दल चीड आहे. डॉक्टरांशी संवाद साधल्यानंतर त्यांच्या मनातील भावना व्यक्त होण्यास मदत होईल, असे केईएमच्या मानसोपचार विभागाच्या प्रमुख डॉ. शुभांगी पारकर यांनी सांगितले.

‘आम्ही गेली अनेक वर्षे या पुलावरून प्रवास करतो. चेंगराचेंगरी ही अनेकदा होत असते. मात्र चेंगराचेंगरीतून मृत्यू कसा होऊ शकतो. यावर विश्वास बसत नाही,’ असे शुक्रवारी या चेंगराचेंगरीतून बचावलेल्या प्रज्ञा बागवे यांनी सांगितले. ‘गेले दोन दिवस रात्रीची झोप येत नाही, आणि सतत दुर्घटनेचे दृश्य डोळ्यासमोर येत राहते,’ अशी भावना या दुर्घटनेतून बचावलेल्या अपर्णा सावंत यांनी व्यक्त केली.

‘आम्ही बचावलेल्या रुग्णांशी बोलून त्यांच्या मनातील भीती, चीड बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करीत आहोत. त्यांचे सुरळीत आयुष्य सुरू होण्यासाठी काही महिन्यांचा कालावधी लागेल. यासाठी केईएम रुग्णालयाच्या मानसोपचारतज्ज्ञांना या रुग्णांचा पाठपुरावा करण्यास सांगण्यात आले आहे,’ असे केईएमचे मानसोपचारतज्ज्ञ डॉ. सागर मुंदडा यांनी सांगितले. अनेक रुग्णांमध्ये दोषीपणाची भावना आहे. या घटनेत आपण कुणाच्या तरी अंगावर होतो. त्यामुळे त्या व्यक्तीचा मृत्यू झाला या विचारांनी ते त्रस्त आहेत, असेही डॉ. मुंदडा यांनी सांगितले.

एल्फिन्स्टन येथील दुर्घटनेतून बचावलेले मृत्यूच्या जवळ जाऊन आले आहेत. त्यामुळे ही घटना त्यांच्या स्मृतीत घट्ट बसली आहे. यातून रुग्णांचा आत्मविश्वास कमी होऊन नैराश्याने ग्रस्त होण्याची शक्यता असते. त्यामुळे समुपदेशनाच्या साहाय्याने रुग्णांना यातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

डॉ. शुभांगी पारकर, मानसोपचार विभागप्रमुख, केईएम रुग्णालय