५० हजाराहून अधिक रुग्णांना सेवेचा फायदा; दिवसाला ३० ते ३५ रुग्णांना उपचारविषयक सल्ला

राज्यभरातील आर्थिकदृष्टय़ा दुर्बल रुग्ण मुंबईतील मोठमोठय़ा रुग्णालयांमध्ये उपचारासाठी येत असतात, मात्र ग्रामीण भागातून प्राथमिक तपासणीसाठी येणाऱ्या रुग्णांना अनेक तासांचा प्रवास करुन उपचारासाठी शहरातील नामांकित रुग्णालयांत यावे लागते. रुग्णांना राहत्या गावातील प्राथमिक केंद्रातूनच तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचार घेता यावेत यासाठी केईएम रुग्णालयात टेली-मेडिसिन पद्धतीने दृकश्राव्य माध्यमातून वैद्यकीय सल्ला दिला जातो. गेल्या ९ वर्षांत ५० हजारांहून अधिक रुग्णांनी तज्ज्ञ डॉक्टरांकडून वैद्यकीय सल्ला घेतला आहे.

सध्या राज्यात ६१ टेली-मेडिसीन केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. नंदुरबार, चंद्रपूर यांसारख्या आदिवासी भागात त्याबरोबर रत्नागिरी, सिंधुदूर्ग, अलिबाग, औंध, सातारा येथेही टेली-मेडिसीनच्या साह्य़ाने रुग्णांना प्राथमिक सल्ले दिले जातात.

या योजनेनुसार २००६ साली ३४६ रुग्णांवर उपचार करण्यात आले. त्यानंतर २०१६ या वर्षांत आठ हजारांहून अधिक रुग्णांवर उपचार करण्यात आले. तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेण्यासाठी या उपक्रमाचा चांगला उपयोग होतो. राज्य सरकारच्या योजनेअंतर्गत ग्रामीण भागात विविध सोनोग्राफी आणि रेडिओलॉजी मशिन आहेत, मात्र त्या क्षेत्रातील तज्ज्ञ नसल्यामुळे अनेकदा केईएमचे डॉक्टर टेली-मेडिसीनच्या माध्यमातून उपचार करतात, ही माहिती टेलि-मेडिसीन विभागाच्या प्रमुख डॉ. कामाक्षी भाटे यांनी दिली.

गेल्या दोन ते तीन वर्षांत टेली-मेडिसीनच्या साहाय्याने सल्ला घेणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत आहे. सध्या दिवसाला ३० ते ३५ रुग्ण टेली-मेडिसीनच्या साहाय्याने सल्ला घेत आहेत. प्रामुख्याने हाडांशी संबंधित आजार किंवा शरीरातील गाठ आणि शरीराअंतर्गत आजार या आजारांसाठी टेली-मेडिसीनचा वापर करण्यात येतो, असेही डॉ. भाटे यांनी नमूद केले. प्रत्येक व्यक्तीला तज्ज्ञ आणि अनुभवी डॉक्टरांकडून उपचार करावयाचे असतात. तर ग्रामीण भागात वैद्यकीय विकसित उपचार पद्धती नसल्यामुळे गावातील नागरिक शहराकडे धाव घेतात. मात्र शहरात त्यांची सोयी-सुविधा होत नाही आणि यांना रस्त्यावर किंवा संस्थेत राहावे लागते. मात्र प्रत्येकवेळी रुग्णाला शस्त्रक्रिया करण्याची गरज असत नाही. तर अनेकदा प्राथमिक सल्ला घेण्यासाठीही हे रुग्ण शहरात येतात, असेही डॉ. भाटे यांनी सांगितले.

दुर्गम भागात व आदिवासी पाडय़ातील नागरिकांना आरोग्याची समस्या उद्भवल्यास शहरातील विशेष रुग्णालयांत उपचारासाठी यावे लागते. तर काही रुग्ण घरगुती उपाय करुन आजार ते उपचार करतात. मात्र प्रत्येकाला तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचार घेता यावे यासाठी २००६ साली सामाजिक वैद्यकीय विभागाच्या साहाय्याने टेली-मेडिसीन ही योजना सुरू करण्यात आली.

डिसेंबर महिन्यात केईएम रुग्णालयात टेली-मेडिसीनवर ऑनलाईन परिषद आयोजित करण्यात आली होती. यापरिषदेत विविध विभागातील तज्ज्ञांनी ऑनलाईन चर्चा केली आणि टेली-मेडिसिनमुळे अधिक रुग्णांना सल्ला देण्यात आला असल्याचे सांगण्यात आले.

 

टेली-मेडिसीनद्वारे उपचार झालेले रुग्ण

वर्ष                   रुग्ण

२००७-०९       ३४६

२००९-१०       २,०८८

२०१०-११       १,३६५

२०११-१२       ३,९६१

२०१२-१३       ६,९००

२०१३-१४       ६,६९०

२०१४-१५       ८,५९४

२०१५-१६       ६,२३०

२०१६-१७       ९,०००