ऐरोली सेक्टर ८ येथील चार दिवसांपूर्वी अपहरण केलेल्या फ्रेन्शिला फ्रान्सिस्को वाझ या आठ वर्षीय चिमुरडीची तिच्या मावशीचा पती क्लेअरन्स फ्रान्सेका याने हत्या केल्याचे उघडकीस आले. त्याला अटक करण्यात आली आहे.
एकवीरा दर्शन या सोसायटीतील प्रवेशद्वाराजवळून सोमवारी या मुलीचे अपहरण करण्यात आले होते. पोलिसांनी अकरा पथके स्थापन करून शोध घेण्याचा प्रयत्न केला, मात्र सोसायटीच्या आजूबाजूला सीसीटीव्ही नसल्याने पोलिसांना धागेदोरे सापडत नव्हते. नवी मुंबई पोलिसांनी या संदर्भात नातेवाइकांकडे चौकशी केली असता क्लेअरन्स फ्रान्सेका या मुलीच्या काकावर संशय आला होता. अधिक चौकशी करता क्लेअरन्सचे ऐरोली सोसायटीजवळील मोबाइल संभाषण आढळून आले.
त्यानंतर ऐरोली व मुलुंड टोल नाक्यावरून मीरा रोडकडे त्यांची कार गेल्याचे दिसून आले. त्यामुळे पोलिसांनी चौकशी केली असता चिमुरडीचा गळा आवळून खून केल्याचे त्याने कबूल केले. खुनानंतर मृतदेह घोडबंदर रस्त्यालगत फेकून तो आपल्या घरी गेला होता. फ्रेन्शिलाच्या आईशी त्याचा वाद झाला होता. क्लेअरन्सने मुलीला तुझी आई मीरा रोडला आमच्या घरी आहे असे सांगून तिला गाडीत बसवले. त्यांनतर गाडीतच मुलीची गळा आवळून हत्या केली. घरी जाऊन मेव्हणीचा फोन आल्यांनतर मीरा भाईदर येथून आरोपी आपल्या पत्नी व मुलांसमवेत ऐरोली येथे आला.
दरम्यान संशय येऊ नये म्हणून माझी महत्त्वाची फाईल गहाळ झाली असल्याचा बनाव रचून आपला मित्र नावेदसमवेत घटनास्थळी पुन्हा जाऊन स्वत:च फेकलेली बॅग घेऊन घरी परतला. या प्रकरणी पोलीस उपआयुक्त सुरेश मेंगडे, पोलीस उपआयुक्त शहाजी उमप यांच्या पथकाने तपास करून चार दिवसांत या गुन्ह्य़ाची उकल केली.