१२ वर्षांखालील मुलांना दहिहंडी फोडण्यास मनाई करणाऱ्या बालहक्क आयोगाच्या आदेशाला केराची टोपली दाखवत गोविंदा पथकांनी कारवाई झाली तरी चालेल, पण बालगोविंदा दहिहंडी फोडणारच, अशी ‘वरचढ’ भूमिका घेतली आहे. समन्वय समितीच्या बैठकीत त्यांनी ही भूमिका घेतल्याने हा संघर्ष आणखीनच पेटला आहे. राज्य सरकारने या प्रकरणी वेळीच हस्तक्षेप करून दिलासा द्यावा, अन्यथा राज्यातील सर्व गोविंदा रस्त्यावर उतरतील, असा इशाराही देण्यात आला आहे.
दहीहंडी फोडण्यासाठी रचण्यात येणाऱ्या थरात १२ वर्षांखालील मुलांचा वापर करणाऱ्या गोविंदा पथकांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश बालहक्क संरक्षण आयोगाने पोलिसांना दिले आहेत. त्यामुळे दहीहंडी उत्सवावरच बहिष्कार टाकण्याची भूमिका सोमवारी समन्वय समितीने घेतली होती. मात्र मंगळवारी झालेल्या बैठकीत गोविंदा पथकांनी या भूमिकेस विरोध केला आणि आयोगाच्या निर्णयावर बहिष्कार टाकून उत्सव साजरा करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला.  सरकारने दोन दिवसांत तोडगा काढला नाही, तर गोविंदा पथके रस्यावर उतरतील, असा इशारा बाळा पडेलकर यांनी दिला, तर कोणत्याही कारवाईची पर्वा न करता महिला बालगोविंदा दहीहंडी फोडणारच, असे ‘पार्ले स्पोर्ट क्लब’च्या नीता झगडे आणि ‘स्वस्तिक महिला गोविंदा पथका’च्या आरती पाठक यांनी सांगितले.