परळ-एल्फिन्स्टन रोड पुलावरील दुर्घटनेनंतर रेल्वे मंत्र्यांनी सुचविलेल्या उपाययोजनांची तातडीने अंमलबजावणी व्हावी यासाठी मुंबई भाजपचे अध्यक्ष, आमदार आशीष शेलार यांच्या अध्यक्षतेखाली चार सदस्यांची पाठपुरावा समिती स्थापन करण्यात आली. रेल्वेचे प्रश्न मांडणारे भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांना मात्र या समितीपासून दूर ठेवण्यात आले आहे. मुंबई भाजपच्या कार्यकारिणीच्या रविवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. तसेच या बैठकीत दुर्घटनेत मृत्यू झालेल्या नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

परळ-एल्फिन्स्टन रोड पुलावर घडलेल्या दुर्घटनेच्या पाश्र्वभूमीवर रेल्वेमंत्र्यांनी रेल्वे सेवेचा दर्जा सुधारण्यासाठी काही उपाययोजना सुचविल्या आहेत. या उपाययोजनांचा पाठपुरावा करण्यासाठी मुंबई भाजपने चार सदस्यीय पाठपुरावा समिती स्थापन केली. मात्र या समितीमध्ये मुंबईमधील खासदारांना स्थान देण्यात आलेले नाही. भाजपचे खासदार किरीट सोमय्या कायम रेल्वेचे प्रश्न दिल्ली दरबारी पोहोचविण्याचे काम करीत आले आहेत. मात्र त्यांचाही या समितीमध्ये समावेश करण्यात आलेला नाही. या समितीमध्ये आमदार भाई गिरकर, माजी आमदार मधू चव्हाण, शिवसेनेला अखेरचा ‘जय महाराष्ट्र’ करून भाजपमध्ये दाखल झालेले नगरसेवक प्रभाकर शिंदे यांचा समावेश आहे.