कारवाईविरोधात ६ एप्रिल रोजी मोर्चा
राज्यात गोवंश हत्याबंदीचा कायदा करणाऱ्या आणि अर्थसंकल्पात गोमाता संवर्धनासाठी योजना जाहीर करणाऱ्या सत्ताधारी भाजपचेच एक नेते व खासदार किरीट सोमय्या यांच्या तक्रारीमुळे मुलुंडमधील मंदिरांसमोर उभ्या असणाऱ्या गायींची महापालिकेने हकालपट्टी केली आहे. परिणामी सुमारे ५० हून अधिक गायींवर आणि त्यांना संभाळणाऱ्या महिलांवर उपासमारीची वेळ आली आहे.
या संदर्भात किरीट सोमय्या यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, ते बैठकीत व्यस्त असल्याचे त्यांच्या कार्यालयातून सांगण्यात आले, त्यामुळे त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.
राज्यात भटक्या-विमुक्त समाजातील नाथपंथी म्हणून ओळखला जाणारा डवरी-गोसावी समाजाचा गायी व बैल पाळणे हा पारंपरिक व्यवसाय आहे. या समाजातील काही कुटुंबे मुंबई, ठाणे, कळवा या परिसरात भाडय़ाने घरे घेऊन राहतात. शहरात त्यांना गायी घेऊन राहाणे शक्य होत नाही. त्यामुळे त्यांनी स्वतच्या गायी तबेल्यामध्ये भाडे देऊन ठेवल्या आहेत, तर काही कुटुंबे तबेल्यातून दिवसाला ५० रुपये भाडय़ाने गायी घेतात. मुंबईत गोपालनावर रोजीरोटी अवलंबून असणाऱ्या कुटंबांची पाच हजारांच्या वर संख्या आहे.
मुंबईतील मंदिरांसमोर दररोज सकाळी सात ते दुपारी बारा वाजेपर्यंत डवरी-गोसावी समाजातील महिला गायी घेऊन बसतात. मंदिरात येणारे भक्त या गायींना त्या महिलांकडून चारा विकत घेऊन चारतात.

त्यातून त्यांना तीनशे-चारशे रुपये मिळतात, असे या महिलांनी सांगितले. मात्र त्यातील तबेल्याचे दिवसाचे ५० रुपये भाडे व चारा शंभर रुपयांचा हा खर्च वजा जाऊन अडीचशे ते तीनशे रुपये हातात उरतात. त्यावरच आमच्या कुटुंबाचे पोट चालते, मुलांचे शिक्षण केले जाते, परंतु आता किरीट सोमय्या यांच्या तक्रारीमुळे मंदिरांसमोर गायींना उभे करण्यास मनाई केल्याने गायींची आणि आमचीही उपासमार सुरू झाली आहे, अशी कैफियत या महिलांनी मांडली.
या संदर्भात मिळालेली माहिती अशी की, पशुपालन व प्राणी दयाभाव या नावाखाली वेगळे प्रकार घडतात, सार्वजनिक ठिकाणी घाण व अस्वच्छता पसरते, त्यातून रोगराई फैलावते, त्याबाबत कारवाई करावी, असे पत्र सोमय्या यांनी १९ डिसेंबर २०१५ रोजी मुलुंड येथील महापालिका साहाय्यक आयुक्तांना दिले होते. त्यावर महापालिकेने मंदिरांसमोर गायी उभ्या करण्यास मनाई केली व त्याबद्दलच्या कारवाईची माहिती सोमय्या यांना २९ फेब्रुवारी २०१६ रोजी पत्राने कळविण्यात आली. त्यावर गायी पाळणाऱ्या महिलांचे म्हणणे असे की, गायी ज्या ठिकाणी बसतात किंवा उभ्या असतात, ती जागा स्वच्छ करूनच आम्ही जातो, त्यामुळे घाण व अस्वच्छता पसरते हा आरोप खोटा आहे.
सरकारने आमच्या रोजीरोटीची, मुलांच्या शाळेची वेगळी व्यवस्था केली, तर गायी पाळण्याचा पारंपरिक व्यवसाय आम्ही सोडून द्यायला तयार आहोत, असे त्यांनी सांगितले.

गायी व भटक्या समाजावर करण्यात आलेल्या या कारवाईच्या विरोधात ६ एप्रिलला महापालिकेच्या मुलुंड प्रभाग कार्यालयावर मुंबई जनता दलाचे अध्यक्ष प्रभाकर नारकर, उल्का महाजन, भटक्या विमुक्तांचे नेते आमदार हरिभाऊ राठोड, मच्छिंद्र भोसले यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात येणार आहे