खाण आणि हवालाकिंग अनिल वस्तावडे याचे सार्वजनिक बांधकामंत्री छगन भुजबळ आणि त्यांच्या कुटुंबियांशी घनिष्ठ संबंध आहेत. वस्तावडे, समीर भुजबळ आणि मुद्रांक घोटाळ्यातील आरोपी अंतिम तोतला यांच्यात परदेशात अनेक वेळा बैठका झाल्या असून हवालाच्या माध्यमातून भुजबळ यांनी शेकडो कोटी रुपये परदेशात पाठविल्याचा आणखी एक आरोप भाजपाचे राष्ट्रीय सचिव किरीट सोमय्या यांनी शुक्रवारी केला.
छगन भुजबळ यांच्या विरोधात सोमय्या यांनी गेल्या काही माहिन्यांपासून आरोपांची मालिका सुरू केली आहे. भुजबळ कुटुंबियांच्या अनेक घोटाळ्यांची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला दिली होती. त्यांची खातरजमा केल्यानंतर भुजबळ आणि त्यांच्या कुटुंबियांची खुली चौकशी करण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने राज्य शासनाकडे परवानगी मागितली आहे. त्याबाबत दोनवेळा सरकारला स्मरणपत्रही पाठविण्यात आली. मात्र त्यानंतरही राज्य सरकार ही परवानगी देण्यास टाळाटाळ करीत भुजबळांना वाचवित असल्याचा आरोपही सोमय्या यांनी यावेळी केला.
 हवालाकिंग अनिल वस्तावडे याला प्रवर्तन संचालनालयाने अटक केली असून सध्या त्याची चौकशी सुरू आहे. वस्तावडे याचे भुजबळांशिवाय राज्यातील काही उद्योजक आणि नेत्यांशीही व्यावसायिक संबंध असून प्रवर्तन संचालनालयाने याची चौकशी करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. भुजबळ यांची ‘मे. आर्मस्ट्राँग एनर्जी कंपनी’ राज्यात कर्जात बुडाली. मात्र याच कंपनीच्या परदेशातील उपकपन्यांनी पदेशात कोळशाच्या खाणी घेतल्या असून त्यासाठी भुजबळ कुटुंबियांनी शेकडो कोटी हवालामार्फत परदेशात पाठविल्याचा आरोपही त्यांनी केला.
तसेच १५ जुलै ते १ ऑगस्ट २०१० दरम्यान समीर भुजबळ, अनिल वस्तावडे, परेश पागे, अंतिम तोतला यांच्यात इंडोनेशिया, सिंगापूरमध्ये बैठका झाल्या असून त्याची चौकशी करण्याची मागणी प्रवर्तन संचालनालयाकडे करण्यात आल्याचेही सोमय्या यांनी सांगितले.