वीज निर्मितीच्या वापरानंतर वाया जाणारे कोयना नदीचे पाणी मुंबईकडे वळविण्याचा राज्य सरकार गांभीर्याने विचार करीत असतानाच माणदेशी भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सातारा, सांगली व सोलापूर जिल्ह्य़ातील नागरिकांनी त्याला तीव्र विरोध केला आहे. दुष्काळी भागाच्या विकासासाठी या पाण्याचा वापर करावा, असे साकडे मानदेश जिल्हा निर्माण परिषदेच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना घालण्यात आले आहे.
वीज निर्मितीच्या वापरानंतर सुमारे ६७ टीएमसी पाणी वसिष्ठ नदीतून अरबी समुद्रात सोडले जाते. मुंबईची वाढती पाण्याची गरज लक्षात घेऊन वाया जाणारे हे पाणी मुंबईकडे वळवावे, अशी अनेक वर्षांपासून शासनस्तरावर चर्चा सुरू आहे. आता अलीकडे त्याला गती देण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. कोयनेचे पाणी बंद पाइपलाइनमधून मुंबईला आणणे मोठी खर्चिक बाब आहे.
हा खर्च राज्य सरकारच्या आवाक्याबाहेरचा आणि मुंबई पालिकेच्या कुवतीपलीकडचा आहे. त्यामुळे हा राष्ट्रीय प्रकल्प म्हणून जाहीर करावा व त्याचा संपूर्ण खर्च केंद्र सरकारने उचलावा, अशी सरकारने मागणी केली आहे. या संदर्भात मानदेश जिल्हा निर्मिती परिषदेचे प्रा. सचिन बनसोडे, चंद्रकांत जगताप, सचिन आठवले व अनिल कांबळे यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले आहे.