अंमली पदार्थ्यांचा साठा केल्या प्रकरणी कोंडुस्कर ट्रॅव्हल कंपनीचा परवाना रद्द करुन चौकशी केली जाईल, अशी घोषणा गृह राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी बुधवारी विधान परिषदेत केली. त्याचबरोबर मरीन लाईन्स पोलीस ठाण्याच्या पोलीसाकडे अंमलही पदार्थाचा साठा सापडल्या प्रकरणाची वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत कसून तपास करुन त्यात दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आश्वासन त्यांनी
दिले.
मरिन लाईन्स पोलीस ठाण्यातील एका हवालदाराच्या कपाटात एमडी नावाच्या मादक पदार्थाचा साठा सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. या संदर्भात विधान परिषदेत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, सुनील तटकरे, किरण पावस्कर, जयंत पाटील आदी सदस्यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. त्यावर निवेदन करताना गृह राज्यमंत्री पाटील यांनी त्या हवलदाराच्या पोलीस ठाण्यातील कपाटात १२ किलो आणि त्याच्या गावातील मित्राच्या घरात ११२ किलो, असे १४ कोटी रुपयांचा अंमली पदार्थाचा साठा सापडल्याची माहिती दिली. या प्रकरणी पोलिस ठाण्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचीही चौकशी केली जाईल. त्यात जे कुणी दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे त्यांनी
सांगितले.