गणेशोत्सवात प्रीमियम दरांत चालवलेली वातानुकूलित डबलडेकर गाडी आता दिवाळीत साध्या दरांत कोकणात धावणार असून या गाडीचे आरक्षण शनिवार, २० सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. या गाडीला जादा थांबेही देण्यात आले आहेत. प्रीमियम दरांमुळे मिळालेल्या थंडय़ा प्रतिसादानंतर आता साध्या दरांत या गाडीला कसा प्रतिसाद मिळतोय, याकडे मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांचे लक्ष आहे.
‘प्रीमियम’ दरांचा धसका घेत कोकणात गणेशोत्सवानिमित्त जाणाऱ्या प्रवाशांनी या डबलडेकरकडे पाठ फिरवली. त्यातच कोकण रेल्वेमार्गावर मालगाडी घसरल्याने वेळापत्रक कोलमडले आणि प्रवाशांनी प्रीमियम गाडीला जादा पैसे मोजण्याऐवजी रस्तामार्गे जाणे पसंत केले. मात्र ही गाडी साध्या दरांत चालवली जावी, यासाठी प्रसारमाध्यमांपासून खासदारांपर्यंत सर्वानी प्रयत्न केले. त्याला यश आल्यानंतर आता ०२००५ डाऊन ही गाडी १६ ऑक्टोबर ते ११ नोव्हेंबर या दरम्यान दर दिवसाआड मुंबईहून करमाळीला, तर ०२००६ अप ही गाडी १७ ऑक्टोबर ते १२ नोव्हेंबर या दरम्यान दर दिवसाआड करमाळीहून मुंबईला साध्या दरांत चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
गोवा जनशताब्दीच्या वातानुकुलित खुर्चीयानाच्या तिकिटाएवढेच दर या गाडीसाठीही आकारले जातील.