गणेशोत्सवासाठी कोकणात जाणारी गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वेतर्फे चालवण्यात येणाऱ्या विशेष गाडय़ांपैकी आरक्षित गाडय़ांची आरक्षण यादी १५ मिनिटांत फुल्ल झाली. यंदा गणेश चतुर्थी २९ ऑगस्टला असल्याने कोकणातल्या आपल्या गावी त्या दिवशी पोहोचण्यासाठी चाकरमान्यांनी २६, २७ आणि २८ ऑगस्ट रोजी रवाना होणाऱ्या गाडय़ांना पसंती दिली आहे. तर २३ आणि २४ ऑगस्ट रोजीच्या गाडय़ांमध्ये वातानुकूलित डब्यांचे आरक्षण उपलब्ध आहे. विशेष गाडय़ांचे आरक्षण फुल्ल झाले असले, तरी ऐनवेळी एखादी अनारक्षित गाडी किंवा प्रिमियम गाडी चालवून चाकरमान्यांना दिलासा देण्यात येईल, असे मध्य रेल्वे प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आले.
गणेशोत्सवादरम्यान कोकणात जाणाऱ्या मांडवी, कोकणकन्या आदी गाडय़ांचे आरक्षण सुरू झाल्यानंतर पहिल्याच मिनिटाला संपले होते. त्यावरून थेट रेल्वेमंत्री सदानंद गौडा यांनीही चौकशीचे आदेश दिले. १५ जुलै रोजी मध्य रेल्वेतर्फे ९० विशेष फेऱ्यांची घोषणा करण्यात आली. या ९० पैकी ५० फेऱ्या आरक्षित गाडय़ांच्या होत्या. या गाडय़ांचे आरक्षण १९ जुलै रोजी खुले करण्यात आले. हे आरक्षण काही मिनिटांतच फुल्ल झाले.

या गाडय़ांचे आरक्षण संपले असले, तरी २३ आणि २४ ऑगस्ट रोजी मुंबईहून निघणाऱ्या गाडय़ांमधील वातानुकुलित श्रेणीची काही आरक्षणे अद्याप उपलब्ध आहेत. कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या गरजेचा विचार करता गणेशोत्सवाच्या काळात डबे उपलब्ध झाल्यास आणखी अनारक्षित गाडय़ा चालवण्यात येतील, असे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी नरेंद्र पाटील यांनी सांगितले.