करंजाडी स्थानकाजवळ रविवारी मालगाडी घसरल्यापासून सुरू झालेले कोकणातील प्रवाशांच्या दुर्दैवाचे दशावतार अखेर बुधवारी संध्याकाळी संपले. बुधवारी रात्रीपर्यंत या मार्गावरील बहुतांश गाडय़ा ‘रुळावर’ आल्या. त्यामुळे गुरुवारी कोकणात निघालेल्या चाकरमान्यांच्या प्रवासात कोणतेही विघ्न येणार नाही, अशी ग्वाही कोकण रेल्वे प्रशासनाने दिली.
मालगाडी रुळावरून घसरल्यामुळे करंजाडी स्थानकाजवळील रेल्वेरुळ उखडले गेले होते. त्यातच मुसळधार पावसामुळे रुळाखालील माती वाहून गेल्याने कोकण रेल्वेपुढे आणखीच प्रश्नचिन्ह उभे राहिले होते. हा बिघाड दुरुस्त करण्यासाठी कोकण रेल्वेने युद्धपातळीवर काम हाती घेतले होते. मात्र त्यामुळे कोकणात जाणाऱ्या सर्वच गाडय़ा मंगळवारी प्रचंड उशिराने धावत होत्या. या गाडय़ांमधील प्रवाशांचेही प्रचंड हाल झाले. काही गाडय़ा रद्द केल्या गेल्याने गावी कसे जायचे, या प्रश्नानेही कोकणवासी हैराण झाले होते. मात्र बुधवारी संध्याकाळपर्यंत कोकण रेल्वेमार्ग पूर्ववत झाल्याचे कोकण रेल्वेच्या मुख्य जनसंपर्क अधिकारी वैशाली पतंगे यांनी सांगितले. गुरुवारी सकाळी कोकणात निघणाऱ्या गाडय़ा त्यांच्या वेळेनुसारच निघतील. गुरुवारी एखाद्या गाडीची वेळ बदलावी लागली, तरी चाकरमानी आपल्या घरच्या गणपतीच्या पूजेला वेळेत पोहोचतील, याची काळजी कोकण रेल्वे घेईल. प्रवाशांच्या सुरक्षेसाठीच करंजाडी स्थानकाजवळील हा मार्ग सुरक्षित करणे गरजेचे होते. त्यामुळे हे काम घ्यावे लागल्याचे पतंगे यांनी सांगितले.
मालवाहतूक बंद
गणेशोत्सवाच्या निमित्ताने कोकणात जाणारे प्रवासी आपल्या गावी सुखरूप पोहोचेपर्यंत या मार्गावरील मालगाडय़ांची वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. याबाबत ‘लोकसत्ता’ने सोमवारच्या अंकात वृत्त प्रसिद्ध केले होते. कोकण रेल्वे प्रवासी सेवा संघाने ही मागणी केली होती. तर खासदार राहुल शेवाळे आणि खासदार अरविंद सावंत यांनीही या मागणीचा पाठपुरावा केला होता. सध्या करंजाडी येथील मार्ग सुरळीत होईपर्यंत या मार्गावरून मालवाहतूक करणे सुरक्षित नसल्याने कोकण रेल्वेने हा निर्णय घेतला आहे.