दरवर्षी पावसाळी परीक्षेत अनुत्तीर्ण होणाऱ्या कोकण रेल्वेने यंदा मान्सूनपूर्व जोरदार तयारी केली आहे. कोकण रेल्वेच्या हद्दीतील कोलाड ते थोकुर रेल्वे स्थानकादरम्यान सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सखोल अभ्यास करून अनेक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. यात दरड कोसळणे, रुळ खचणे अशा समस्या उद्भवू नयेत, यासाठी विशेष काळजी घेण्यात आली आहे.

पावसाळ्यात कोकण रेल्वे मार्गावर दरड कोसळण्याच्या घटना घडत असतात. यात रेल्वेचे आर्थिक नुकसान होण्यासह प्रवाशांच्या सुरक्षितेचा प्रश्नही ऐरणीवर येतो. याच धर्तीवर कोकण रेल्वेने सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून तयारी केली आहे. विशेष म्हणजे पावसाळ्यात रेल्वेच्या वाहतुकीवर परिणाम होऊ नये, यासाठी तब्बल ९५० कर्मचारी गस्त घालणार आहेत, तर कोकण रेल्वे मार्गावरील धोकादायक ठिकाणी २४ तास सुरक्षारक्षक तैनात असणार आहेत. मुसळधार पावसात रेल्वे मार्गावर दृश्यमानता कमी झाल्यास लोको ड्रायव्हर (रेल्वे गाडी चालक) यांना ४० किलोमीटर प्रति तास वेगाने गाडी चालवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

याशिवाय कोकण रेल्वे मार्गादरम्यान रुग्णवाहिका तैनात करण्यात येणार आहेत. या रुग्णवाहिकेत ऑपरेशन करण्याची सुविधाही पुरवण्यात आली आहे.

  • प्रवाशांच्या सोयीसाठी बेलापूर, रत्नागिरी आणि मडगाव येथे २४ तास नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहेत.
  • गाडय़ांची सद्यस्थिती प्रवाशांना उपलब्ध व्हावी यासाठी १३९ आणि १८००-२३३१-३३२ हा टोल फ्री क्रमांक उपलब्ध करून देण्यात आल्याचे कोकण रेल्वेकडून सांगण्यात आले.