कुमार राजगोपालन (रिटेलर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी)

दसऱ्याबरोबरच दिवाळीही ई-कॉमर्सच्या लोकप्रियतेच्या फेऱ्यात यंदा अडकणार आहेच. हाताच्या बोटावर एका क्लिकसरशी होणाऱ्या खरेदीकरिता ऑनलाईन शॉपिंग ग्राहकवर्गासाठी एक देणगीच. मात्र प्रत्यक्ष दुकानात जाऊन याचि देही याचि डोळा अनुभव देणारी ऑफलाईन खरेदीही अनेकांसाठी हवीहवीशी ठरते. याबाबत ऑफलाईन म्हणजे मोठय़ा दालनांची साखळी असलेल्या संघटित क्षेत्राचा मंच असलेल्या रिटेलर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार राजगोपालन यांच्याशी केलेली बातचीत झ्र्

* सणांचा हंगाम सुरू होणाऱ्या ऑक्टोबरच्या सुरुवातीपासूनच ई-कॉमर्स बाजारपेठेचा प्रसार-प्रचार धडाका सुरू झाला आहे. ऑफलाईनचे नेतृत्व म्हणून तुम्हाला कमी व्यवसायाची भीती वाटत नाही काय?

मुळीच नाही. दोन्ही प्रकार वेगळे आहेत. ऑनलाईन आणि ऑफलाईन हे काही एकमेकांचे शत्रू नव्हेत. उलट समान ग्राहक असलेल्यांसाठी दिलेला तो बहुविध पर्यायच आहे. ई-कॉमर्स क्षेत्रातील कंपन्यांकडून उत्पादन विक्रीबाबत प्रचार, प्रसार मोहिमेचा वेळोवेळी मारा केला जातो, हे सत्य आहे. पण म्हणून ऑफलाइन रिटेल बाजारपेठे निस्तेज आहे, असे मानण्याचे कारण नाही. ऑफलाईन रिटेल व्यवसायही बाजारपेठेच्या दृष्टीने मोठा आहे. १००, २५० अशी दालन साखळी चालविणाऱ्या अनेक बडय़ा कंपन्या/नाममुद्रेची संघटित साखळी आहे.

* यंदाच्या सणात, विशेषत: दिवाळीत या क्षेत्राचा प्रवास तुम्ही कसा पाहता?

ई-कॉमस म्हणा किंवा ऑफलाइन रिटेल व्यवसाय यंदाचा दसरा तर एकूणच चांगला गेला आहे. आकडेवारीतच सांगायचे झाले तर गेल्या सणांच्या हंगामाच्या तुलनेत  यंदाचा व्यवसाय १० ते १५ टक्क्य़ांनी वाढण्याची शक्यता आहे. वर्षभर होणाऱ्या एकूण खरेदीपैकी साधारणपणे २५ त ३० टक्के खरेदी ही केवळ सणसमारंभाच्या कालावधीत होते. कंपन्यांची अनेक उत्पादने आणि सूट-सवलतींचे अधिकाधिक पर्याय यंदा उपलब्ध आहेत. तेव्हा यंदा हा उद्योग निश्चितच दुहेरी अंकातील व्यवसाय वाढ राखेल.

* ग्राहकांच्या क्रयशक्तीबाबत सध्या कसे वातावरण आहे? खरेदीसाठीचा त्यांचा उत्साह रिटेलकरिता लाभदायक ठरतोय काय?

ग्राहकांची खरेदी दिवसेंदिवस वाढतेच आहे. सण-समारंभासारखे त्याला निमित्त आजकाल फारसे लागत नाही. क्रयशक्ती वाढीसाठी अन्यही अनेक घटक कारणीभूत ठरतात. यंदा तर दमदार मान्सून आणि त्याजोरावर होणारे कृषी उत्पादन, केंद्रीय कर्मचाऱ्यांना लागू झालेल्या सातवा वेतन आयोग, कमी होत असलेली महागाई, अर्थव्यवस्थेला मिळत असलेली चालना, कंपन्यांचे अधिक फायद्यात जाहीर होणारे दुसऱ्या तिमाहीचे वित्तीय निष्कर्ष असे सारचे जुळून आले आहे. तेव्हा यंदाचा खरेदी हंगामही रिटेल व्यवसायासाठीही लाभदायी निश्चितच ठरेल.

* ग्राहकांचा खरेदी कल यंदा कसा आहे, असे वाटते? कोणत्या पूरक गोष्टी त्यासाठी तुम्ही नमूद कराल?

मोबाइल तसेच टीव्ही आदी गॅझेट, गृहपयोगी विद्युत उपकरणे याला ग्राहकांकडून अधिक पसंती दिली जात आहे, हे नि:संशयच. या बाजारपेठेत नव नवीन उत्पादने येत आहेत. मात्र अशा अधिक मागणी असलेल्या वस्तूंना यंदा वाढीव वित्त सूट-सवलतींची जोड मिळाली आहे. शून्य टक्के व्याज, कमीत कमी डाऊन पेमेंट असे सुलभ आर्थिक सहाय्य बँका, वित्त कंपन्या घेऊन आल्या आहेत. मासिक हप्त्यावर होणारी विद्युत उपकरण विक्रीचे प्रमाण यंदा वाढले आहे. २० ते २५ टक्के ग्राहक अशा सुलभ अर्थसहाय्याला पसंती देतात.

* महाराष्ट्रात नुकतेच जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठय़ाकरिता रात्री उशिरापर्यंत विक्री करण्यास परवानगी मिळाली आहे. रिटेलरकरिता ते कितपत फायद्याचे आहे?

रिटेल व्यवसायाचे प्रतिनिधित्व म्हणून आम्ही तर या निर्णयाचे स्वागतच करतो. मुंबईसारखी महानगरे उशिरापर्यंत वर्दळ अनुभवत असतात. अशावेळी जीवनावश्यक वस्तूंची गरज नेमकी अधिक जाणवते. ग्राहकराजाच्या हिताचाच निर्णय राज्याने घेतला आहे. ई-कॉमस, नाविन्यतेवर आधारित ग्राहकसेवा अशी तगडी स्पर्धा ऑफलाईन रिटेल व्यावसायिकांपुढे असताना असे निर्णय या क्षेत्राकरिता लाभाचेच ठरतील. रिटेल क्षेत्र सध्या वाढत्या खर्चाचाही सामना करत आहे. यामध्ये वाणिज्यिक वापरांच्या जागांचे चढे भाव यांचाही समावेश आहे. व्यवसायपूरक सरकारी निर्णय ऑफलाईन रिटेलसाठी अपेक्षित आहेत. तसे काही प्रमाणात घडत आहे.