प्रशासकीय हलगर्जीमुळे कुर्ला येथील भाभा पालिका रुग्णालय तातडीने बंद करण्याची नामुष्की ओढवलेल्या पालिकेने आता तीन वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये पर्यायी व्यवस्था करण्याचे योजले आहे. पालिकेच्या एकाच रुग्णालयात वेगवेगळ्या सेवांसाठी धावपळ करणाऱ्या रुग्णांना आता भाभा रुग्णालयातील बाह्य़ रुग्ण कक्षानंतर मुक्ताबाई, राजावाडी व शताब्दी रुग्णालयात फेऱ्या माराव्या लागणार आहेत. दरम्यान भाभा रुग्णालयाच्या पुनर्विकासाऐवजी प्रशासनाने पुन्हा दुरुस्तीचा निर्णय घेतला आहे.
पालिका अधिकाऱ्यांचा निर्णय घेण्यातील ढिसाळपणा व नियोजनातील अभाव यामुळे कुर्ला भाभा रुग्णालय बंद करण्याची वेळ आली आहे. ३०० खाटांच्या या रुग्णालयातील इमारती मोडकळीस आल्याने तातडीने खाली करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणाकडून विद्याविहार येथील इमारतींचा ताबा घेऊन त्यात रुग्णालय हलवण्याच्या पालिकेच्या योजनांचा बोजवारा उडाला आहे. इमारती ताब्यात येण्यासच दीड वर्ष लागणार असून त्यानंतर रुग्णालयासाठी त्यात बदल करावे लागतील. तोपर्यंत रुग्णालय बंद ठेवण्याची नामुष्की कमी करण्यासाठी आता रुग्णालयाच्या पुनर्विकासाऐवजी नुतनीकरणाचा घाट पालिका घालत आहे.
३०० खाटांच्या या रुग्णालयाची पर्यायी व्यवस्था करण्यास पालिका सक्षम नसल्याने आता गोवंडी येथील शताब्दी रुग्णालयात सीटी स्कॅन- एमआरआय, घाटकोपर येथील मुक्ताबाई रुग्णालयात प्रसुती विभाग तर राजावाडीमध्ये शस्त्रक्रिया विभागाची तरतूद केली जाणार आहे.
दरम्यान पालिकेच्या हलगर्जीपणाबाबत संतापाची लाट उसळल्याने आयुक्तांनी तातडीने दुरुस्ती करून सहा महिन्यात रुग्णालय पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती स्थानिक नगरसेविका व स्थायी समिती सदस्य डॉ. अनुराधा पेडणेकर यांनी दिली. भाभा रुग्णालयातील बाह्य़ रुग्ण कक्षही कायम ठेवला जाणार असून रुग्णवाहिकांमधून तातडीने इतर रुग्णालयात नेण्याची व्यवस्था करण्याबाबतही आयुक्त अजय मेहता यांनी सूचना दिल्या आहेत.
 कोणतीही पूर्वसूचना न देता भाभा रुग्णालय बंद करण्याच्या प्रशासनाच्या निर्णयाचा विरोधी पक्षनेते देवेंद्र आंबेरकर यांनी निषेध केला आहे. बाह्य़ रुग्ण कक्षासोबतच अपघात विभागाचेही काम सुरू ठेवल्यास रहिवाशांना मदत होईल, असेही त्यांनी अतिरिक्त आयुक्त (आरोग्य) संजय देशमुख यांना लिहिलेल्या पत्रात सुचवले आहे.