भारनियमन, जागेच्या अडचणी, प्रकल्पाविरोधातील आंदोलने यांमुळे महाराष्ट्रातील उद्योग शेजारील राज्यांच्या आश्रयाला जात असल्याची ओरड होत असतानाच लार्सन अॅण्ड टुब्रो (एल अॅण्ड टी) या मुंबईस्थित कंपनीची त्यात भर पडण्याची चिन्हे आहेत. गेल्या काही वर्षांत टप्प्याटप्याने अनेक युनिटचे स्थलांतर आणि स्वेच्छानिवृत्तीच्या माध्यमातून हजारो कामगारांना घरचा रस्ता दाखविल्यानंतर या नामांकित कंपनीने आता उर्वरित विभागही गुजरातमध्ये स्थलांतरित करण्याचा घाट घातला आहे.
 लार्सन अॅण्ड टुब्रो ही नामांकित कंपनी केल्या ७५ वर्षांपासून पवईत आहे. मात्र सध्या या जागेला सोन्यापेक्षा जास्त भाव मिळू लागल्याने कंपनीला जागाविक्रीतून नफा कमावण्याची स्वप्ने पडू लागली आहेत. त्यामुळेच कंपनी व्यवस्थापनाने गेल्या काही वर्षांत टप्प्याटप्प्याने कंपनीचा गाशा गुंडाळण्यास सुरुवात केली असून आता तर संपूर्ण कंपनीच मुंबईबाहेर स्थलांतरित करून या जागेवर टॉवर उभारण्याचा घाट घातला जात असल्याचे समजते.
काही काळापूर्वी या कंपनीत विविध विभागांमध्ये सुमारे सात हजार कामगार होते. मात्र आता तेथे हेवी इंजिनीअरिंग विभागात ८०० आणि स्विच गीअरमध्ये ६०० तसेच इन्फोटेक कंपनीत १०० असे सुमारे १५०० कामगारच उरले आहेत. त्यातच आता हेवी इंजिनीअरिंग सुरतजवळील हाजिरा येथे, तर स्विच गीअर युनिट बडोदा येथे स्थलांतरित करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. स्विच गीअरमधील मरिन इंजिनीअरिंग पॅनल, कंट्रोल अॅण्ड अॅटोमेशन या विभागाचे आधीच स्थलांतर झाले आहे. मॉडय़ुल सर्किट ब्रेकर युनिट वर्षभरापूर्वीच बडोदा येथे स्थलांतरित करण्यात आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे या कंपनीचे इव्हॅक युनिट गुजरातमध्ये हलवून त्या जागेत आता डिप्लोमा कॉलेज चालविले जात आहे, तर कॉलेजच्या इमारतीच्या परिसरात १५ एकर जागेत आता टॉवर उभारले जात आहेत.
हे सर्व करताना येथील कामगारांना स्थलांतरित करण्याऐवजी त्यांना स्वेच्छानिवृत्ती घेण्यास भाग पाडले जात आहे. विरोध करणाऱ्या कामगारांना कठीण ठिकाणी बदली देऊन नोकरी सोडण्यास भाग पाडले जात आहे. काही महिन्यांपूर्वी अशाच प्रकारे ५०० कामगारांना स्वेच्छानिवृत्ती घेण्यास भाग पाडल्याची तक्रार काही कामगारांनी केली आहे. जागेला चांगला भाव मिळत असल्यामुळे कंपनी गुजरातला हलवून येथे टॉवर उभारण्याचा व्यवस्थापनाचा डाव असून त्यांना कामगारांचे प्रतिनिधित्व करणारी भारतीय कामगार सेना हातभार लावीत असल्याचा आरोपही या कामगारांनी केला. याबाबत भारतीय कामगार सेनेच्या एल अॅण्ड टी कंपनी युनिटचे सरचिटणीस भरत भोसले यांच्याशी संपर्क  साधला असता, कंपनीतील शेवटचा कामगार निवृत्त होईपर्यंत कोणत्याही परिस्थितीत ही कंपनी स्थलांतरित होऊ देणार नाही, असा दावा त्यांनी केला.
वाहतूक अडचणीचे कारण ..
कंपनीचे अधिकृत प्रवक्ते (कॉर्पोरेट पीआर) डी. मोरांडा यांच्याशी संपर्क साधला असता, कंपनी स्थलांतराचा प्रस्ताव नाही, असे त्यांनी सांगितले. मात्र मुंबईतून मोठी यंत्रसामुग्री अन्यत्र पाठविताना वाहतुकीची अडचण येत असल्यामुळे काही मोठी यंत्रसामुग्री मुंबईबाहेर बनविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच पवईत विस्तारीकरणास वाव नसल्यामुळे काही विभाग अन्यत्र हलविण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. कंपनीच्या १५ एकर जागेत गृहनिर्माण प्रकल्प सुरू करण्यात आल्याचेही त्यांनी मान्य केले.