पश्चिम रेल्वेकडून आठ महिन्यांत ११ हजार जणांवर कारवाई; २५ लाख दंडवसुली

रेल्वेच्या लोकल गाडय़ांतील महिलांच्या डब्यांत पुरूषांना प्रवास करण्यास मनाई आहे. मात्र, त्याकडे कानाडोळा करत या डब्यांत प्रवास करणाऱ्या पुरूषांची संख्या लक्षणीय आहे. यंदाच्या आठ महिन्यांत १० हजार ७८५ पुरुष प्रवाशांनी महिलांच्या डब्यांत घुसखोरी केल्याचे पश्चिम रेल्वेच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. रेल्वेने त्यांच्यावर कारवाई करून २५ लाख ५० हजार रूपयांचा दंड वसूल केला आहे.

पश्चिम रेल्वेच्या सुरक्षा बलाने जानेवारी ते ऑगस्ट २०१७ या आठ महिन्यांच्या कालावधीत विविध कारणांसाठी (विनातिकीट प्रवासी वगळता) १ लाख ३३ हजार २३७ जणांवर कारवाई केली. त्यांच्याकडून तीन कोटींहून अधिक रकमेचा दंड वसूल करण्यात आला. महिलांच्या डब्यांतून प्रवास करणाऱ्या पुरूषांची संख्या लक्षणीय असल्याचे या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.

महिलांच्या डब्यांपाठोपाठ अपंगासाठी आरक्षित डब्यांतही धडधाकट प्रवाशांची मोठय़ा प्रमाणात घुसखोरी होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. अपंगांच्या आरक्षित डब्यांतून प्रवास केल्याप्रकरणी आठ महिन्यांत ३८ हजार १३८ प्रवाशांवर कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून तब्बल ८७ लाख ७९ हजार रूपयांचा दंड वसूल करण्यात आला.

  • रेल्वे हद्दीत व लोकल गाडय़ांत बेकायदा व्यवसाय करणाऱ्या १८ हजार ६७८ फेरीवाल्यांवर पश्चिम रेल्वेने कारवाई केली.
  • लोकल, मेल-एक्स्प्रेसमधील आपत्कालीन साखळी विनाकारण ओढून रेल्वेचा वेळ वाया घालविणाऱ्या १ हजार १४२ प्रवाशांना पकडण्यात आले.
  • अनधिकृतपणे तिकिट विक्री करणाऱ्या ३९१ जणांवर कारवाई करण्यात आली.
  • पश्चिम रेल्वे मार्गावर विनातिकिट प्रवास करणाऱ्या १ लाख ७५ हजार प्रवाशांना पकडण्यात आले. त्यांच्यावर केलेल्या कारवाईतून ६ कोटी ७६ लाखांचा दंड वसूल करण्यात आला आहे.