फिजिओथेरेपिस्ट असलेल्या एका तरुणीच्या हत्येने विलेपार्ले पोलिसांची झोप उडाली. हत्येनंतर तिच्यावर बलात्कार झाल्याने प्रकारणाचे गांभीर्य वाढले होते. पण त्याहून धक्कादायक खुलासा आरोपीला अटक केल्यानंतर झाला.

फिजिओथेरेपिस्ट डॉक्टर तरुणीच्या निर्घृण हत्येने विलेपार्ले पोलिसांची झोप पार उडवून टाकली होती. महिला डॉक्टरवर बलात्कार झाल्याची माहितीही वैद्यकीय तपासणीत बाहेर आल्याने त्यातील गांभीर्य अधिकच वाढले होते. पोलीस आयुक्तांपासून सर्वच जण या हत्येची उकल व्हावी म्हणून आग्रही होते. परंतु काही केल्या नेमका दुवा पोलिसांना मिळत नव्हता. त्यामुळे या हत्येची उकल करणे हे पोलिसांपुढील आव्हानच बनले होते.

फिजिओथेरेपिस्ट डॉक्टर तरुणीचे कुटुंब विलेपार्ले येथील एका चाळीत राहत होते. या घरासमोर एक मोरी होती. शांतपणे अभ्यास करता यावा यासाठी या मोरीच्या वर एक छोटी खोली बांधण्यात आली होती. सदर तरुणी आपल्या बहिणीसह तेथे अभ्यास करायची आणि दोघी एकत्र झोपायच्या. शेजारच्या मैत्रिणीही तिच्यासोबत गप्पा मारण्यासाठी या खोलीत येत असत. फिझिओथेरपीचा अभ्यासक्रम संपल्यानंतर ती नोकरी करीत होती. पुढील शिक्षण घेण्याचाही तिचा मानस होता. वडिलांची परिस्थिती बेताची होती. महिन्याला २० हजार रुपये कमावणाऱ्या वडिलांनी मुलीच्या शिक्षणासाठी १२ लाखांचे कर्ज घेतले होते. पुढील शिक्षणासाठी तिला परदेशात जायचे होते. ‘मास्टर्स इन फिजिओथेरपी’चा अभ्यासक्रम मुंबईत पूर्ण करण्यासाठी तीन वर्षे घालवावी लागत होती. तीच पदव्युत्तर पदवी परदेशात दोन वर्षे होती. त्यामुळे वडिलांनी आणखी एक कर्ज घेण्याचीही तयारी सुरू केली होती. परंतु सदर तरुणीने नोकरी करून प्रति महिना पैसे साठविण्यास सुरुवात केली होती. परंतु त्याआधीच तिची निर्घृण हत्या झाली. या तरुणीची हत्या नेमकी कोणी व का केली असावी, असा प्रश्न पोलिसांप्रमाणे रहिवाशांनाही सतावत होता.

घरी जेवण झाल्यानंतर ती झोपण्यासाठी वरच्या खोलीत जात असे. बऱ्याच वेळा तिच्यासोबत तिची बहीणही असे. परंतु हत्या घडली त्या दिवशी ती एका मित्राच्या वाढदिवसाच्या पार्टीला गेली होती. रात्री उशिरा ती घरी परतली आणि थेट ती तिच्या खोलीत गेली. शेजारी राहणारी मैत्रीण काही काळ तिच्यासोबत खोलीत गप्पा मारत होती. परंतु सदर तरुणीने आपल्याला खूप झोप येतेय, असे सांगितल्यानंतर तिची मैत्रीण निघून गेली. परंतु जाताना दरवाजा बंद करण्यास विसरली. त्याचाच फायदा उठवीत अज्ञात इसमाने तिच्यावर बलात्कार करून तिची हत्या केली.

मध्यरात्रीनंतर खोलीतून धूर येऊ लागल्यामुळे शेजारच्यांनी कुटुंबीयांना जागे केले. पोलिसांना कळविण्यात आले. दरवाजा फोडून तिचा अर्धवट जळालेला मृतदेह ताब्यात घेण्यात आला. तिच्याच जीन्स पँटचा वापर करून गळा आवळण्यात आला होता. खोलीतील कागदपत्रे तोंडावर टाकून मृतदेह जाळण्यात आला होता. वैद्यकीय तपासणीत तिच्यावर बलात्कार झाल्याचे स्पष्ट झाले आणि पोलीस हादरले. एका तरुण महिला डॉक्टरची निर्घृण हत्या झाली होती. परंतु कुठलाही दुवा पोलिसांच्या हाती लागत नव्हता. अज्ञात इसमाने घरात प्रवेश करून सुरुवातीला तिच्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. परंतु ती ओरडेल आणि आपण पकडले जाऊ, या भीतीने हत्या करून नंतर बलात्कार करण्यात आला होता. न्यायवैद्यक चाचणीत हे स्पष्ट झाले होते. तिने प्रतिकार केला, असेही अहवालात होते. ओळखीच्या व्यक्तीनेच तिच्यावर बलात्काराचा प्रयत्न करून नंतर हत्या केली असावी, असाही एक अंदाज होता. परंतु त्या अज्ञात इसमाचा शोध लागत नव्हता.

खोलीचा दरवाजा ज्या अर्थी बाहेरून बंद करण्यात आला होता, त्याअर्थी ओळखीच्या व्यक्तीने खोलीत प्रवेश करून तिच्यावर बलात्कार करून तिची हत्या केली असावी, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज होता. त्यामुळे तिच्या मित्रमैत्रिणींची कसून चौकशी सुरू झाली. परंतु काही ठोस पोलिसांच्या हाती लागले नाही. त्यामुळे या तरुणीची हत्या नेमकी कोणी केली, याबाबत शोध सुरू झाला. त्यासाठी रस्त्यावर असलेल्या एका सीसीटीव्ही फुटेजची मदत घेण्यात आली. या फुटेजवरून तिच्या घराजवळ त्या दिवशी दिसलेल्या एका तरुणावर संशय बळावला. परंतु सीसीटीव्ही फुटेज अस्पष्ट असल्यामुळे त्याचा फायदा झाला नाही.

सहायक आयुक्त प्रकाश गव्हाणे, वरिष्ठ निरीक्षक महादेव निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली विविध पोलीस ठाण्यातील १२ अधिकारी आणि २५ शिपायांची नऊ पथके स्थापन करून तपास सुरू करण्यात आला होता. तब्बल ५०० जणांची कसून चौकशी करण्यात आली होती. यामध्ये संबंधित तरुणीचे रुग्ण तसेच मित्र परिवार, परिसरातील तरुणांचा समावेश होता. सीसीटीव्ही फुटेजमधील तरुणाच्या अस्पष्ट छायाचित्रावरूनही पोलिसांचे पथक थेट पश्चिम बंगालमध्ये पोहोचले होते. याच परिसरात सलग आठ वर्षे राहणारा एक तरुण या घटनेनंतर काही काळ गायब झाला होता. त्यामुळे पोलिसांचा त्याच्यावर संशय होताच. परंतु हातात ठोस पुरावा नसल्यामुळे कारवाई करता येत नव्हती. सतत पाळतीवर असलेल्या पथकाला अखेर पश्चिम बंगालमध्ये संशयित असलेला देबाशीष धारा हा तरुण सापडला. परंतु त्याने आपण कोणाचीही हत्या केलेली नाही, अशी भूमिका घेतली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये मिळालेल्या छायाचित्रावरूनच तो तोच असावा, असेही स्पष्ट होत नव्हते. अखेरीस डीएनए चाचणी करण्याचे ठरविण्यात आले. धाराच्या डीएनए चाचणीचा अहवाल मिळताजुळता आला आणि पोलिसांचा संशय खरा ठरला. त्याला अटक करण्यात आली. पोलिसी खाक्या दाखवतातच त्याने घटनाक्रम उघड केला.

काम करून आल्यानंतर रात्रीच्या वेळी आपण या परिसरात फिरत असू आणि खिडकी उघडी आढळली तर आत डोकावून पाहण्याची आपल्याला सवय होती. फिजिओथेरेपिस्ट तरुणी पहिल्या मजल्यावर राहत होती, याची कल्पना होती. तिच्या खोलीत दिवा होता. त्यामुळे सवयीप्रमाणे डोकावले तर ती गाढ झोपली होती. दरवाजाही उघडा होता. मी शांतपणे आत गेलो. तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न करताच ती जागी झाली. त्यामुळे तिचीच जीन्स पँट घेऊन गळा आवळला. काही क्षणात ती निपचित पडली. तिच्यावर मी बलात्कार केला. दरवाजा बंद करून निघून गेलो. त्यानंतर दुसऱ्या दिवशीही आपण तेथे आलो आणि नंतर गावी निघून गेलो.. धारा पोलिसांना शांतपणे सांगत होता. पश्चात्तापाचा लवलेशही त्याच्या चेहऱ्यावर दिसत नव्हता. एका हुशार महिला डॉक्टरच्या आणि तिच्या कुटुंबीयांच्या स्वप्नांचा त्याने चक्काचूर केला होता.. मात्र थोडी

काळजी घेतली असती तर कदाचित तिचा जीव वाचू शकला असता, अशी सल कुटुंबीयांना सलत होती.

निशांत सरवणकर @ndsarwankar