मुंबईवरील २६/११ हल्ल्याच्या कटातील सुत्रधारांपैकी एक असलेला लष्कर-ए-तोयबाताचा दहशतवादी डेव्हिड कोलमन हेडलीची अमेरिकेतील तुरुंगातून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चौथ्या दिवसाची साक्ष सुरू झाली आहे. हेडलीने गेल्या तीन दिवसांपासूनच्या जबाबात केलेल्या गौप्यस्फोटांची मालिका कायम ठेवत आजही धक्कादायक खुलासे केले आहेत. होय, मी शिवसेना भवनात जाऊन तेथे राजाराम रेगे याची भेट घेतली होती. राजारामच्या ओळखीमुळे मला शिवसेना भवनात प्रवेश करता आला, असा धक्कादायक खुलासा हेडलीने केला आहे. शिवसेना भवनाचा व्हिडिओ तयार करून तो लष्कर-ए-तोयबाकडे पाठवून दिल्याचेही त्याने कबुले केले आहे.
शिवसेना भवनाच्या भेटीचे कारण विचारले असता, तेथे काम कसे चालते? आत कोणती आणि किती माणसे असतात? याची माहिती भविष्यात शिवसेना भवन आणि शिवसेना प्रमुखांवर हल्ला करताना ‘लष्कर-ए-तोयबा’ला उपयोगी ठरू शकते म्हणून शिवसेना भवनाची रेकी करण्यासाठी तेथे गेलो होतो, असे हेडलीने स्पष्ट केले आहे.
हेडलीच्या साक्षीमुळे सत्ताबाह्य़ केंद्रे उघड होतील – रिजिजू
दरम्यान, राजाराम रेगे हे माजी शिवसैनिक असून, हेडलीने शिवसेना भवनात भेट घेतल्याची दिलेली माहिती पूर्णपणे खोटी असल्याचे म्हटले. हेडलीशी केवळ दोन मिनिटांची भेट झाली होती. त्याने शिवसेना भवन आतून पाहण्याची इच्छा व्यक्त केली होती. पण मी त्यास स्पष्ट नकार दिला होता. त्यानंतर माझे त्याच्याशी काहीच बोलणे झाले नाही, असे राजाराम रेगे यांनी सांगितले.
याशिवाय, सिद्धिविनायक मंदिरावर हल्ला करताना हल्लेखोरांची ओळख लपविण्यासाठी मंदिरातून गंडे खरेदी केल्याचाही खुलासा हेडलीने केला. भाभा अणुशक्ती संशोधन केंद्राचे (बीएआरसी) चित्रीकरण करून ते फुटेज मी मेजर इक्बाल आणि साजिद मीर याला पाठविल्याचा दावा हेडलीने आपल्या कबुली जबाबात केला आहे. २६/११ हल्ल्यावेळी दहशतवाद्यांना पाकिस्तानातील कराची येथूनच सर्व आदेश दिले जात होते. यासोबतच गेट-वे ऑफ इंडिया येथे नौदलाचे मुख्यालय असल्यामुळे तेथे न उतरण्याचा सल्ला देखील आपणच हल्लेखोरांना दिला होता, अशी महत्त्वपूर्ण माहिती हेडलीने दिली.