काही दहीहंडी सम्राटांनी जाचक नियमांमुळे आयोजनातून माघार घेतली असली तरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना अद्याप शहाणपण आलेले नाही. रस्ते, पदपथ ही आपली खासगी मालमत्ता असल्याच्या थाटात बहुतांश सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी लालबाग-परळ भागात आपले हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. पदपथावर खड्डे खोदून बांबू व खांब उभारणे तसेच रस्त्यावर कमानींसाठी बांबूच्या पराती सर्रास उभ्या केल्या आहेत.लालबाग-परळ हा भाग अत्यंत रहदारीचा आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावरून दादर व भायखळा या दिशेने वाहतूक होत असते. हा भाग म्हणजे सार्वजनिक गणेशोत्सवाचे माहेरघर समजला जातो. अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या स्वयंघोषित ‘राजा’ची येथे प्राणप्रतिष्ठा करण्यात येते. चिंचपोकळी उड्डाणपुलावरून उतरल्यानंतर दादरच्या दिशेने जाताना संत जगनाडे चौकाच्या थोडे पुढे आल्यानंतर एका ‘राजा’च्या भव्य कमानी रस्त्यात व पदपथाला अगदी लागून उभारण्यात आल्या आहेत. या पदपथावरच भाजीविक्रेते, फेरीवाले, पूजा साहित्याची दुकाने असून तेथे सायंकाळी प्रचंड गर्दी उसळलेली असते. त्यात वाहनांची ये-जा सुरू असते.गणेशोत्सवाच्या निमित्ताने कमानींसह मोठय़ा प्रमाणात विद्युत रोषणाई केली जाते. या रोषणाईसाठी रस्ते किंवा पदपथावर मोठय़ा प्रमाणात लाकडी बांबू किंवा लोखंडी खांब उभे केले जातात. त्या खांबांवर दिव्यांच्या माळा व विद्युत रोषणाई केली जाते. लालबाग-परळ भागात दत्ताराम लाड मार्ग, परिसरातील अन्य गल्ल्या, रस्ते तसेच मुख्य रहदारी असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावरील पदपथांवर, रस्त्यांवर चक्क खड्डे खणून हे बांबू व लोखंडी खांब उभे केल्याचे दृश्य पाहायला मिळत आहे. रस्ते किंवा पदपथावर खड्डे खोदून विद्युत रोषणाईसाठी आणि कमानींसाठी बांबू उभारण्यास महापालिकेने अधिकृत परवानी दिली आहे का? की परवानगी न घेताच हे सुरू आहे? उत्सव संपल्यानंतर खणण्यात आलेले खड्डे व पदपथ या मंडळांकडून अगोदर होत तसे व्यवस्थित करून देण्याची अट पालिकेने या मंडळांवर टाकली आहे का? असा प्रश्न या परिसरातील नागरिक आणि व्यापाऱ्यांकडून विचारण्यात येत आहे. गणेशोत्सवाला अद्याप काही दिवस बाकी आहेत. महापालिका प्रशासनाने याची वेळीच दखल घेऊन तातडीने कार्यवाही करावी, अशी अपेक्षा सर्वसामान्य नागरिकांची आहे.