यंदा दान कमी; आकडा सव्वा सहा कोटींपर्यंत जाण्याची शक्यता

गणेशोत्सव काळात लालबागच्या राजाच्या दानपेटीमधून ५ कोटी ९३ लाख रुपयांची रोकड मंडळाकडे जमा झाली आहे. मात्र दानपेटीमध्ये मिळालेल्या परदेशी चलनाची मोजणी अजूनही बाकी आहे. त्यामुळे हा आकडा ६ कोटी २० लाख रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. असे असले तरी गतवर्षीच्या तुलनेत राजाच्या दरबारी यंदा कमी दान पडल्याचे चित्र दिसत आहे. शिवाय दानपेटीमधून मोठय़ा संख्येने चलनातून रद्द झालेल्या नोटाही बाहेर पडल्या आहेत.

गणेशोत्सवाच्या काळात मुंबईसह अगदी जगभरातील भाविक लालबागच्या राजाच्या दरबारात दर्शनासाठी हजेरी लावतात. त्यामुळे उत्सवानंतर दानपेटीच्या मोजणीकडे साऱ्यांचे लक्ष लागलेले असते. यंदाच्या लालबागच्या राजाच्या दानपेटीतील रकमेची मोजणी पूर्णत्वाला आली आहे. मंडळाकडून मूर्तीजवळ तसेच मुखदर्शनाच्या रांगेत दानपेटय़ा ठेवण्यात येतात.  शनिवारच्या दिवसाअखेरीस दानपेटीमधून तब्बल ५ कोटी ९३ लाख रुपयांची रोकड मंडळाकडे जमा झाली आहे. मात्र दानपेटीत मिळालेल्या विदेशी चलनाची भारतीय चलनात मोजणी करण्याची प्रक्रिया अजूनही बाकी आहे. हे चलन साधारण २० ते २५ लाख रुपयांपर्यंत असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे परदेशी चलनाच्या मोजणीअंती दानपेटीतील रकमेचा शेवटचा आकडा हा साधारण ६ कोटी २० लाख रुपयांच्या घरात असेल, अशी माहिती मंडळाचे खजिनदार महेश जाधव यांनी दिली. शिवाय हा आकडा स्पष्ट होण्याकरिता बुधवारचा दिवस लागणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

गतवर्षी दानपेटीमधून सुमारे ८ कोटी रुपयांची रोकड जमा झाली होती. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा भाविकांनी मंडळाच्या दानपेटीत कमी दान टाकल्याचे दिसत आहे. २९ ऑगस्ट रोजी पडलेला मुसळधार पाऊस, त्यामुळे रोडावलेली भाविकांची गर्दी या कारणांनी रोख रक्कम कमी जमा झाल्याचे सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे नोटाबंदीच्या निर्णयानंतर चलन व्यवस्थेतून हद्दपार करण्यात आलेल्या पाचशे व एक हजाराच्या नोटा दानपेटीत सापडल्या आहेत. १ लाख ३० हजार रुपये जुन्या नोटांच्या स्वरूपात मंडळाला मिळाले आहेत.