मुंबई आणि लगतच्या परिसरात दळणवळणाचे भव्य प्रकल्प हाती घेण्याची तयारी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने सुरू केल्यानंतर आता त्यासाठीच्या हजारो कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा प्रश्न उभा ठाकला आहे. साहजिकच त्यासाठी ‘एमएमआरडीए’ची नजर पुन्हा एकदा वांद्रे-कुर्ला संकुलातील जमिनीकडे वळली आहे. संकुलातील जागांचा लिलाव करून त्यातून हजारो कोटी रुपये सहज उभे करता येतील, असा प्राधिकरणाचा होरा असून अर्थात नवीन सरकार आल्यानंतरच त्याबद्दलच्या हालचाली सुरू होण्याची अपेक्षा आहे.
कुलाबा-सीप्झ तिसरी मेट्रो रेल्वे, शिवडी-न्हावाशेवा सागरी सेतू, वडाळा-कासारवडवली मेट्रो रेल्वे, दहिसर-वांद्रे-मानखुर्द भुयारी रेल्वे असे प्रकल्प आता ‘एमएमआरडीए’च्या रडारवर आहेत. त्यासाठी जवळपास एक लाख कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे. अर्थात प्रकल्प खर्चाचा मोठा भाग कर्जाच्या माध्यमातून निधी उभारून पूर्ण होईल. मात्र प्रकल्पासाठी काही भागभांडवल प्राधिकरणाला घालावे लागणार आहे.
या निधीची तरतूद करण्यासाठी वांद्रे-कुर्ला संकुलातील जी ब्लॉकमधील २२ एकर जमिनीची विक्री करण्याची योजना पुन्हा ऐरणीवर येण्याची शक्यता आहे. २००८-०९ मध्ये ‘एमएमआरडीए’ने जमीन विक्रीचा प्रयत्न केला होता. पण मंदीच्या सावटामुळे लिलाव अपयशी ठरले.चांगले दर येण्याची चिन्हे नसल्याने प्राधिकरणाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जमीन विक्रीची योजना बाजूला ठेवली होती. आता मंदीचे सावट दूर होत आहे. त्यामुळे या जमिनीचा लिलाव करून हजारो कोटी रुपये सहज उभारता येतील, चांगला दर मिळेल, अशी प्राधिकरणाची अपेक्षा आहे. मात्र आता महिनाभरात नवीन सरकार राज्यात सत्तेवर येईल. प्राधिकरणाचे प्रमुख या नात्याने मुख्यमंत्रीच जमीनविक्रीबाबत अंतिम निर्णय घेतात. त्यामुळे आता नवीन सरकार आल्यावरच जमीन विक्रीच्या योजनेवर हालचाली सुरू होतील.