देवेंद्र फडणवीस यांचे सरकार ३१ ऑक्टोबर रोजी सत्तेवर आले, परंतु त्यांनतरच्या पहिल्या तीन महिन्यांतच गुन्हेगारीत वाढ झाली. नोव्हेंबर २०१४ ते मार्च २०१५ या काळात राज्यात एकूण ८०५ बलात्कार, ५२५ हत्या आणि १८५० दंगली झाल्या. तर चोरी, दरोडय़ाच्या तब्बल ७ हजार ३४२ घटनांची नोंद झाली. एकटय़ा मुंबईचा विचार केला तर मुंबईत दररोज सोनसाखळी चोरीच्या सरासरी ५ घटना घडत आहेत. मुंबईत गेल्या दोन वर्षांत ५ हजार ६६६ मुले बेपत्ता झाली होती. त्यापैकी १९९० मुलांचा अद्याप शोध लागला नाही. गेल्या दोन वर्षांत ५ हजार ६६६ मुले बेपत्ता झाली होती. त्यापैकी १९९० मुलांचा अद्याप शोध लागला नाही. याशिवाय राज्यात महत्त्वाच्या व्यक्तींच्या दिवसाढवळ्या हत्या, महिलांवरील अमानुष अत्याचाराचे प्रकार घडले आहेत. पोलिसांचा वचक नसल्याने त्यात दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे चित्र आहे.  

गेल्या काही महिन्यांतील मुंबईतील घटना
जानेवारी २०१५
*पोलिसांवर हल्ला करण्याच्या एकूण ४ घटना
*वडाळा येथून चिमुरडीचे अपहरण आणि बलात्कार
*एचडीएफसी बँकेच्या एटीएममध्ये कॅश भरायला नेण्यात येत असलेली व्हॅन पळवली. १ कोटी ७९ लाख रुपयांची लूट
फेब्रुवारी २०१५
*कॉटनग्रीन स्थानकातून घरी जात असलेल्या २१ वर्षीय तरुणीवर तिघांचा सामूहिक बलात्कार
मार्च २०१५
*गोरेगाव येथे सात वर्षीय चिमुरडीचे रिक्षाचालकाने अपहरण करून रात्रभर विविध ठिकाणी बलात्कार
*मानखुर्द येथून सेंट्रल बँक ऑफ इंडियाची एटीएम कॅश व्हॅन पळवली. १ कोटी २८ लाखांची लूट
*मरिन ड्राइव्ह पोलीस ठाण्याचा पोलीस कर्मचारी धर्मा काळोखेला अमली पदार्थाच्या व्यवहारात अटक.
*वांद्रे येथे डायरस कपाडिया (७८) या ज्येष्ठ नागरिकाची चोरीच्या उद्देशाने हत्या

पोलिसांचा वचक नसल्याचा परिणाम..
नागपूर : राज्यातील सुरक्षित म्हणून ओळख असलेल्या येथील मध्यवर्ती कारागृहातून पाच कैद्यांनी पलायन केल्याने नागपूरसारख्या शहरात गुन्हेगार कसे सराईत झाले आहेत हे दिसून आले आहे. गुन्हेगारांवरील पोलिसांचा वचक कसा कमी झालेला आहे, हेही अधोरेखित झाले आहे. नागपूर  परिसरात गेल्या ३ महिन्यांत झालेल्या गँगवॉरसह अन्य गुन्ह्य़ांची वाढती संख्या याचे गांभीर्य अधोरेखित करते.

नगरमध्ये पोलीसच असुरक्षित
नगर : एका पोलीस कर्मचाऱ्याची हत्या, उपनिरीक्षकालाच मारहाणीच्या दोन घटना, प्रेमप्रकरणातून युवकाची विवस्त्र धिंड, नगर शहरात दंगलसदृश तणाव आणि सुडाच्या भावनेतून महिलेवर चौघांकडून सामूहिक बलात्कार.. गृह राज्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेत्यांच्या जिल्ह्य़ातील गेल्या तीन महिन्यातील गुन्ह्य़ांची ही मालिका.

दहशतवादाचे धागेदोरे मराठवाडय़ापर्यंत
औरंगाबाद : मध्य प्रदेशातील बॉम्बस्फोटात अडकलेल्या झाकीर हुसेन या सिमीच्या अतिरेक्याला नांदेडमधून आधार कार्ड काढून देण्यासाठी शेख मुखीर नावाच्या नगरसेवकाने मदत केल्याचे प्रकरण मराठवाडय़ात ताजे आहे. अधूनमधून देशभरात महत्त्वाच्या शहरांतील अतिरेकी हल्ल्याचे धागेदोरे मराठवाडय़ापर्यंत पोचल्याचे दिसून येत असते. अलीकडच्या काळात किरकोळ गुन्ह्य़ांची व्याप्ती वाढली आहे.

पश्चिम महाराष्ट्राला गालबोट
सांगली : पश्चिम महाराष्ट्रात गेल्या काही महिन्यांत कॉम्रेड गोिवद पानसरे यांची हत्या, साखर कारखानदारीतील गुन्हेगारी आणि वाळू तस्करीतील संघटित गुन्हेगारीने पुरोगामी या ओळखीला गालबोट लावले आहे.

नाशिक गुन्हेगारीच्या विळख्यात
नाशिक : वाळूमाफियांचा धुडगूस, महाविद्यालयीन युवकांची हत्या, अंतर्गत वादातून गोळीबार, दागिने खेचून नेण्याच्या घटना, अंधश्रद्धेपोटी महिलेचा दिला गेलेला बळी तसेच पैशांचा पाऊस पाडण्याचे दाखविलेले आमिष यामुळे  उत्तर महाराष्ट्र गुन्ह्य़ाच्या विळख्यात सापडला आहे.