गेल्या काही वर्षांमध्ये उंच दहीहंडीला गवसणी घालण्यासाठी थरांची स्पर्धा सुरू झाली आणि मुंबईतील गोविंदा पथकांनी नऊ थरांवर मजल मारली. पथकांमधील युवक-युवतींची संख्याही वाढू लागली आणि त्यांना पोशाख म्हणून तयार करण्यात येणाऱ्या टी-शर्ट, हाफ पॅन्टचा व्यवसाय तेजीत आला. मात्र यंदा दहीहंडीची उंची आणि थरात सहभागी होणाऱ्या लहान मुलांवर मर्यादा आल्याने या व्यवसायालाही ग्रहण लागले आहे. गोकुळाष्टमीच्या निमित्ताने या व्यवसायाची होणारी उलाढाल निम्म्यावर आली आहे.मुंबई-ठाण्यातील  गोविंदा पथकांची संख्या प्रचंड आहे. या पथकांची नोंदणी नसल्याने त्यांची नेमकी आकडेवारी सांगणे अवघड आहे. मात्र आपल्या पथकाची वेगळी ओळख निर्माण व्हावी यासाठी त्यात सहभागी होणाऱ्या गोविंदांना ठरावीक रंगाचे टी-शर्ट आणि हाफ पॅन्ट दिली जाऊ लागली. त्यामुळे गेल्या दशकामध्ये गोकुळाष्टमीनिमित्त ठरावीक कापडापासून टी-शर्ट, हाफ पॅन्ट शिवणाऱ्या कारखान्यांना चांगले दिवस आहे. पण यंदा न्यायालयाने उंची आणि १२ वर्षांखालील मुलांना थरामध्ये घातलेली बंदी आणि राज्य सरकारच्या धोरणात नसलेली स्पष्टता यामुळे नेते मंडळी आणि गोविंदा पथकांनी टी-शर्ट, पॅन्ट शिवून घेण्याबाबत हात आखडता घेतला आहे. त्यामुळे या व्यवसायावर परिणाम झाला आहे. एक टी-शर्ट सुमारे ७० ते १५० रुपयांपर्यंत, तर हाफ पॅन्ट १०० रुपयांपर्यंत शिवून मिळते.

कापडाच्या दर्जावर त्याची किंमत ठरते. तसेच त्यावर मंडळाचे नावही असते. पथकात सहभागी होणाऱ्या ३००-४०० मुलांना टी-शर्ट, हाफ पॅन्ट देण्यासाठी हजारो रुपये आणायचे कुठून असा प्रश्न पथकांना पडला आहे. गोविंदा पथके कोणत्या रंगाचे टी-शर्ट, पॅन्ट घेणार याची कल्पना ते शिवणाऱ्यांना असते. त्यामुळे ते आधीच कापड खरेदी करून ठेवतात. यंदा पथके आणि नेत्यांकडून फारसा प्रतिसाद न मिळाल्याने खरेदी केलेले कापड पडून राहिले आहे. त्याचे काय करायचे अशी चिंता कारखान्याच्या मालकांना पडली आहे.दरवर्षी गोपाळकाल्यापूर्वी दोन-तीन दिवस आदी काही नेत्यांकडून पथकांना टी-शर्ट आणि पॅन्ट दिले जातात. त्यावर संबंधित नेत्याची छबी, नाव नोंदविलेले असते. गोविंदाच्या निमित्ताने प्रसिद्धी मिळविण्याची ही नामी संधी नेते मंडळी सोडत नाहीत. या टी-शर्ट, पॅन्टचा दर्जा सुमार असतो, पण फुकट मिळत असल्याने गोविंदा आनंदाते ते घालून उत्सव साजरा करतात. पण यंदा या नेत्यांनी आखडता हात घेतला आहे.
छोटय़ा गोविंदा पथकांतील गोविंदा नेत्यांकडून टी-शर्ट, पॅन्ट मिळते का याची चाचपणी करीत आहेत. पण त्यांच्या पदरी निराशा येत आहे. अनेक नेत्यांच्या कार्यालयांचे उंबरठे झिजवूनही टी-शर्ट, पॅन्ट मिळत नसल्याने यंदा काय करायचे असा प्रश्न त्यांना पडला आहे. आयोजक दहीहंडय़ा बांधणार नसल्याने बक्षीसही मिळणार नाही. त्यामुळे आता पदरमोड करून टी-शर्ट, पॅन्ट घेतले तर त्यासाठी खर्च केलेले पैसे कसे उभे करायचे असा प्रश्न पथकांना भेडसावत आहेत.