विधानभवनातील कार्यक्रमास केवळ अधिकारीच

फुले-शाहू-आंबेडकरांचे नाव घेणाऱ्या महाराष्ट्रात मुंबईतील विधानभवनात झालेल्या महात्मा जोतिबा फुले यांच्या पुण्यतिथी कार्यक्रमाकडे विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, विधान परिषद सभापती रामराजे नाईक-निंबाळकर वा कोणीही ज्येष्ठ मंत्री, आयएएस अधिकारी फिरकले नाहीत. या कार्यक्रमास केवळ माजी विधानसभा सदस्य काँग्रेसचे मधु चव्हाण आणि दोन-तीन अधिकारी उपस्थित होते. शिवाय महात्मा फुले पुण्यतिथीनिमित्त अभिवादनाच्या जाहिराती करण्याची तसदीही राज्य वा केंद्र सरकारने घेतली नाही.
अनेक महापुरुषांच्या जयंती, पुण्यतिथी साजऱ्या होतात, पुतळे उभारले जातात. विधानभवन, मंत्रालय येथेही वर्षभरात त्यानुसार अभिवादनाचे कार्यक्रम होतात. महात्मा फुले यांची १२५वी पुण्यतिथी शनिवारी होती. मात्र चौथ्या शनिवारी शासकीय कार्यालयांना सुट्टी असल्याने सकाळी ११ वाजता विधानभवनात फारसे कोणी फिरकले नाही. मुंबईतीलही आमदार, मंत्री, आयएएस अधिकारी यांनीही त्याकडे पाठ फिरविली. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे मराठवाडय़ात होते. काँग्रेसचे माजी आमदार मधु चव्हाण यांच्याबरोबर उपसचिव राजेश तारवी, अवर सचिव प्र. स. मयेकर व अन्य अधिकारी उपस्थित होते. महापुरुषांच्या पुण्यतिथी-जयंती यांच्या अभिवादन कार्यक्रमांची छोटी टिप्पणी सर्वाना पाठविली जाते, असे सूत्रांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.
सामाजिक न्याय
विभागाला विसर?
माहिती व जनसंपर्क विभागातर्फे महापुरुषांच्या जयंती-पुण्यतिथीला ज्या जाहिराती केल्या जातात, त्यामध्ये महात्मा फुले यांचा समावेश नाही. त्या सामाजिक न्याय विभागाकडून केल्या जातात. हे धोरण आधीपासूनचेच असल्याचे माहिती व जनसंपर्क विभागातील उच्चपदस्थांनी अधिकाऱ्यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.
मुख्यमंत्र्यांची नागपुरात आदरांजली
अधिवेशनानिमित्ताने विधानभवन कार्यालय नागपूरला गेले असल्याची माहिती विधिमंडळाचे प्रधान सचिव डॉ. कळसे यांनी दिली.
तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरला महात्मा फुले यांना आदरांजली वाहिली असल्याचे मुख्यमंत्री कार्यालयातर्फे सांगण्यात आले.

महात्मा फुले पुण्यतिथीनिमित्ताने अभिवादन करणाऱ्या जाहिराती दिल्या गेल्या नाहीत. पुण्यतिथीच्या जाहिरातींपेक्षा जयंतीनिमित्ताने मोठय़ा प्रमाणावर दिल्या जातात. पुढील वेळी योग्य ती काळजी घेतली जाईल.
– दिलीप कांबळे, सामाजिक न्याय विभागाचे राज्यमंत्री

अभिवादनाच्या जाहिराती नाहीत

’संविधान दिवसानिमित्ताने संसदेत प्रदीर्घ चर्चा झाली आणि त्याबद्दल डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे छायाचित्र असलेल्या जाहिरातीही करण्यात आल्या.
’गांधी पुण्यतिथीला ३० जानेवारी रोजी केंद्र सरकारने जाहिरात दिली होती. वर्षपूर्तीनिमित्ताने राज्य सरकारनेही जाहिरातींवर कोटय़वधी रुपये खर्च केले.
’महात्मा फुले यांना अभिवादन करण्यासाठी शनिवारी फारसा उत्साह दाखविण्यात आला नाही. याबाबत सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

महात्मा फुलेंबद्दल आदरच – बागडे
मी औरंगाबाद येथे कनिष्ठ अभियंत्यांच्या कार्यक्रमाचे निमंत्रण आधीच स्वीकारले होते, असे विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले. त्यामुळे मुंबईत उपस्थित नव्हतो. शिवसेनेचे मंत्री मराठवाडय़ात आहेत. विधिमंडळाचे प्रत्येक सदस्य आपल्या मतदारसंघात महात्मा फुले यांना आदरांजली वाहत असतात व अनेक कार्यक्रम साजरे करीत असतात. त्यांच्या अनादराचा प्रश्नच येत नाही, असे बागडे यांनी स्पष्ट केले. विधिमंडळाचे प्रधान सचिव डॉ. अनंत कळसे यांनीही तसेच स्पष्टीकरण दिले.