राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघातील मध्यवर्ती तुरुंगातून बराकीचे गज तोडून खतरनाक गुंड पळून जातात, तुरुंग अधीक्षकाच्या कार्यालयात कैद्यांच्या वाढदिवसांच्या पाटर्य़ा झोडल्या जातात, एक तडीपार गुंड भर रस्त्यात एका तरुणीला विवस्त्र करून मारतो, पोलीसच आरोपींना लेडीज बारमध्ये घेऊन रात्रभर त्यांची सरबराई करतात, हे कमी की काय म्हणून नगर जिल्ह्य़ात एका महिलेवर सामूहिक बलात्कार केला जातो, महाराष्ट्रात कायदा व सुव्यवस्थेचे पुरते धिंडवडे निघाले आहेत, मुख्यमंत्र्यांचा वचक राहिलेला नाही, त्यामुळे त्यांनी गृहखाते सोडावे, अशा जोरदार शब्दांत विरोधी पक्षांनी आज विधान परिषदेत मुख्यमंत्र्यांवरच निशाणा साधला.
राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर आहे, त्यामुळे सर्व कामकाज बाजूला ठेवून यावर चर्चा झाली पाहिजे, अशी मागणी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली. यावर सभापती रामराजे नाईक-निंबाळकर सरकारच्या निवेदनासंदर्भात काही वक्तव्य करीत असतानाच, राष्ट्रवादी व काँग्रेसच्या सदस्यांनी कायदा-सुव्यवस्थेवर चर्चा झालीच पाहिजे, अशा घोषणाच सुरू केल्या आणि सभागृहात गोंधळ माजला. विधिमंडळ कामकाज मंत्री गिरीश बापट यांनाही विरोधी सदस्य बोलू देत नव्हते. या विषयावर चर्चा झाली नाही तर सभागृहाचे कामकाज होऊ देणार नाही, असा इशारा माणिकराव ठाकरे यांनी दिला. आक्रमक विरोधकांच्या गोंधळामुळे पहिल्यांदा २० मिनिटांसाठी व नंतर दहा-दहा मिनिटांसाठी असे चार वेळा सभागृहाचे कामकाज तहकूब करावे लागले. शेवटी सभापतींनी अन्य नियमानुसार चर्चा घेण्यास मान्यता दिली, आणि धनंजय मुंडे यांनी नागपुरातील गेल्या काही दिवसांतील गुन्हेगारीच्या घटनांवर बोट ठेवत मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केले.
राजेगावात एका महिलेवर सामूहिक बलात्कार केला जातो. राज्यात कायदा व सुव्यवस्था शिल्लक आहे का, असा घणाघाती हल्ला त्यांनी मुख्यमंत्र्यांवर चढविला, तर गृहखात्यावर वचक नसल्याने मुख्यमंत्र्यांनी गृहखाते सोडावे, अशी मागणी माणिकराव ठाकरे यांनी केली.