मतदानाच्या दिवशी मतदान केंद्र प्रमुखांना मतपेटय़ा आणि साहित्य विधानसभा मतदारसंघातील मुख्य केंद्रावर पोहोचवाव्या लागतात. ही सर्व प्रक्रिया पूर्ण करून केंद्रातून निघेपर्यंत शिक्षकांना पहाटेचे तीन वाजण्याचे प्रकार गेल्या निवडणुकांदरम्यान घडले आहेत. त्यामुळे शिक्षकांना मतदानाच्या दिवशी सात वाजता कामातून मुक्त करावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळाने केली आहे.
विधानसभा मतदारसंघातील मुख्य निवडणूक केंद्र तालुक्याच्या ठिकाणी असते. या ठिकाणी प्रत्येक मतदारकेंद्रातील केंद्र प्रमुखांना जाऊन मतपेटय़ांसह इतर सर्व साहित्य परत करावे लागते. केंद्रप्रमुखांनी आणलेले साहित्य मुख्य निवडणूक केंद्रावर तपासले जाते. एका केंद्राची ही सर्व प्रक्रिया होईपर्यंत दीड ते दोन तासांचा अवधी लागतो. तालुक्यापासून लांब असलेल्या केंद्रातील केंद्र प्रमुखांना मुख्य केंद्रावर पोहचण्यास उशीर होतो यामुळे ओळख तपासणीसाठीचा क्रमांकही उशीरा येतो. परिणामी त्यांना निघण्यासही उशीर होतो. रात्री उशीरापर्यंत हे काम करून त्यांना दुसऱ्या दिवशी पुन्हा सकाळी शाळेतही पोहचायचे असते. यामध्ये महिला कर्मचाऱ्यांना खूप त्रास सहन करावा लागतो, असे मत राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे प्रवक्ते प्रशांत रेडीज यांनी व्यक्त केले. याबाबत प्रशासनाकडे वारंवार तक्रार करूनही याकडे लक्ष दिलेले नाही. आता केंद्र आणि राज्य निवडणूक आयुक्तांकडे मागणी करण्यात येणार असल्याचेही रेडीज यांनी सांगितले. केंद्र प्रमुख शिक्षकांना त्यांचे साहित्य मुख्य निवडणूक केंद्राऐवजी विभागीय निवडणूक केंद्रात जमा करण्यास मुभा द्यावी. त्यामुळे काम वेळेत संपणे शक्य होईल आणि प्रशासन तसेच शिक्षकांनाही सोयीचे होईल, असे आयोगाला सुचविण्यात येणार असल्याचे रेडीज म्हणाले.