पावसाळ्यात डोके वर काढणाऱ्या लेप्टो आणि डेंग्यू यांसारख्या साथीच्या आजारांवर नियंत्रण आणण्यासाठी पालिकेची यंत्रणा फोल ठरत असून दिवसेंदिवस या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. यापुढेही मुसळधार पावसामुळे या रुग्णांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. साचलेल्या पाण्यामध्ये वाढणाऱ्या डासांमुळे संसर्ग होणाऱ्या डेंग्यूचे गेल्या चार दिवसांत ९१ रुग्ण आढळले आहेत.

पालिकेने डासांचा नायनाट करण्यासाठी वेगवेगळ्या योजना आखल्या असतानाही वीस दिवसांमध्ये ३२० डेंग्यूच्या रुग्णांची नोंद झाली आहे. याबरोबरच प्राण्यांच्या मलमूत्रामुळे संसर्ग होणाऱ्या लेप्टोचे वीस दिवसांत २८८ लेप्टो रुग्णांची नोंद पालिकेच्या रुग्णालयात झाली आहे. रुग्णालयातील तापाचे वाढणारे रुग्ण पाहता पालिकेच्या डॉक्टरांसाठी चिंतेची बाब झाली आहे. त्याशिवाय दूषित अन्नपाण्यामुळे उद्भवणाऱ्या तापाच्या रुग्णातही कमालीची वाढ झाली आहे. ११ ते १८ जुलै यादरम्यान तापाचे ३७०२ रुग्ण आढळले असून २५ ते २८ जुलै या चार दिवसांत १०२० इतके रुग्ण आढळले आहेत. तर या चार दिवसांत मलेरियाचे ११४, गेस्ट्रोचे २२० आणि हेपेटायटिसच्या १८ रुग्णांची नोंद झाली आहे.

साथीच्या आजारांवर नियंत्रण आणण्यासाठी पालिकेने सर्वाना स्वच्छतेचे आवाहन केले आहे. डेंग्यू हा आजार साचलेल्या पाण्यामुळे पसरतो. त्यामुळे पावसाच्या दिवसात घरात आणि आजूबाजूच्या परिसरात पाणी साठणार नाही याची खबरदारी घ्यावी. अनेकदा टायर, कचऱ्यामध्ये सांडपाणी साचून राहते आणि यातून अनेक आजारांचा फैलाव होतो. हे टाळण्यासाठी घराबरोबरच आजूबाजूच्या परिसराच्या स्वच्छतेबाबत जागृत असावे. याबरोबरच डेंग्यू झालेल्या रुग्णाचा डासांपासून बचाव केला जावा. तर लेप्टो आजार दूषित अन्न-पाण्यामुळे होतो. त्यामुळे बाहेरील अन्नपदार्थ खाणे टाळावे. पावसाळ्याच्या दिवसात पिण्यासाठी गरम पाण्याचा वापर करावा. इमारतीतील पिण्याचे पाणी साठविणाऱ्या टाक्या स्वच्छ असल्याची खात्री करून घ्यावी. सतत ताप येणे, अंगदुखी आणि डोकेदुखी, डोळ्यांची जळजळ अशी लक्षणे आढळल्यास ताबडतोब पालिकेच्या रुग्णालयात तपासणी करून घ्यावी.