मुंबईकरांना मोकळा श्वास घेण्यासाठी उद्याने उपयुक्त ठरत असून राज्य सरकार आणि पालिकेच्या संयुक्त प्रयत्नातून हरित मुंबई साकारू या, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी केले.
मुंबई महापालिकेतर्फे दादर (प.)मधील सेनापती बापट मार्गावरील दादर उदंचन केंद्र येथील ‘प्रमोद महाजन कला पार्क’चे उद्घाटन देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रविवारी करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महापौर स्नेहल आंबेकर यांनी भूषविले. यावेळी मुंबईचे पालकमंत्री सुभाष देसाई, मुंबई भाजपचे अध्यक्ष आशीष शेलार, खासदार राहुल शेवाळे, पूनम महाजन, पालिका आयुक्त अजय महेता उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी प्रमोद महाजन यांच्याबद्दलच्या आठवणींना उजाळा दिला.प्रमोद महाजन यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ उद्यान उभारल्याबद्दल महापालिकेला धन्यवाद देऊन मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, मुंबईकरांना मोकळा श्वास घेता यावा यासाठी मुंबईत आणखी उद्यानांची आवश्यकता आहे. राज्य सरकार आणि महापालिकेच्या प्रयत्नातून ती साकारण्यात येतील.

असे आहे ‘प्रमोद महाजन कला पार्क’

दादर उदंचन केंद्रातील ४१,९१६ चौरस मीटर क्षेत्रफळावर प्रमोद महाजन कला पार्क साकारण्यात आले असून उद्यानात २५,९०० चौरस मीटर जागेत १४० प्रजातींची एक लाखांहून अधिक शोभिवंत फुलझाडे आणि झुडपे आहेत. त्यासोबत उद्यानात विविध प्रजातींचे ३५० वृक्ष व ४,४०० चौरस मीटर जागेत आकर्षक हिरवळ साकारण्यात आली आहे. विविध प्रकारच्या पाच हजार शोभिवंत फुलझाडांनी या उद्यानाची शोभा वाढविली आहे. उद्यानात फुलांच्या वाफ्यासह पिरॅमिड असून कमळांची तीन तळी, वर्षां जलसंजयनेसह तरंगते कारंजे आहेत. सावलीत वाढणाऱ्या विविध प्रकारच्या प्रजातींचे प्रदर्शन ‘प्रिझम’ येथे आहे. ज्येष्ठ नागरिकांना चालण्यासाठी पायवाटा, बसण्यासाठी २०० बाकडी, पिण्याच्या पाण्यासाठी सहा पाणपोई, स्त्री-पुरुषांसाठी स्वतंत्र प्रसाधनगृह उद्यानात आहे. तसेच पर्यटकांसाठी उपहारगृहाचीही व्यवस्था करण्यात आली आहे.