भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे लंडनमधील वास्तव्य ज्या घरात होते ते घर खरेदी करण्यासंदर्भात राज्य सरकारने पुढील पाऊल उचलले आहे. हे घर खरेदी करण्यासाठी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी लंडनमधील भारताच्या उच्चायुक्तांना ‘लेटर ऑफ इंटेंट’ अर्थात इरादापत्र पाठवले आहे. भारताच्या लंडनमधील उच्चायुक्तांमार्फत राज्य सरकार घर खरेदीची प्रक्रिया करणार आहे.
लंडनमधील भारतीय उच्चायुक्तांना पाठवलेल्या इरादापत्रात तावडे यांनी म्हटले आहे की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी वास्तव्य केलेले लंडन येथील हे घर सांस्कृतिक आणि राष्ट्रीयदृष्ट्या महत्त्वाचे आहे. लाखो भारतीयांच्या दृष्टीने अभिनानास्पद असलेली ही वास्तू खरेदी करण्याचा निर्णय राज्य सरकारने यापूर्वीच घेतला आहे. त्यादृष्टीने हे घर खरेदी करण्यासाठी हे इरादापत्र आपल्याला पाठवत आहे. आपल्याशी झालेल्या चर्चेनुसार आपण योग्य किंमतीत हे घर खरेदी करण्याबाबतची कायदेशीर प्रक्रिया सुरू केली असेलच. आम्हाला विश्वास आहे की लंडन येथील प्रशासन यासाठी सर्वतोपरी सहकार्य करेल, असे तावडे यांनी या पत्रात म्हटले आहे.