‘लिपस्टिक अंडर माय बुरखा’वरची बंदी हटवणार नाही; निहलानींची स्पष्टोक्ती

संस्कृतिरक्षकाची आपली भूमिका योग्य असल्याचा सूर आळवत सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष पहलाज निहलानी यांनी पुन्हा एकदा आपली कात्री चालवली असून या वेळी दिग्दर्शक प्रकाश झा यांची निर्मिती असलेला ‘लिपस्टिक अंडर माय बुरखा’ हा चित्रपट त्याचा बळी ठरला आहे. हा चित्रपट ‘स्त्रीकेंद्रित’ आणि ‘शिवराळ शब्दां’नी भरलेला असल्याचे सांगत चित्रपट प्रमाणित न करण्याच्या आपल्या निर्णयावरून आपण मागे हटणार नाही. समाजमाध्यमांच्या दबावालाही बळी पडणार नाही, असे पहलाज निहलानी यांनी शनिवारी स्पष्ट केले.

छोटय़ा शहरांमधील स्त्रियांच्या गुजगोष्टी उलगडून दाखवणाऱ्या अलंक्रिता श्रीवास्तव दिग्दर्शित ‘लिपस्टिक अंडर माय बुरखा’ हा चित्रपट गेले काही दिवस चर्चेचा विषय राहिला आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरला लोकांकडून प्रचंड प्रतिसादही मिळाला आहे. मात्र, स्त्रियांचे चुकीच्या पद्धतीचे चित्रण यात करण्यात आले आहे. लैंगिक दृश्ये, शिवीगाळ आणि अश्लील संवादाने भरलेल्या या चित्रपटामुळे स्त्रियांची चुकीची प्रतिमा जनमानसांमध्ये रंगवली जाते आहे, असा दावा करत सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटाला प्रमाणपत्र देण्यास नकार दिला आहे. बोर्डाच्या या निर्णयामुळे चित्रपट प्रदर्शनाच्या प्रतीक्षेत असलेल्या अनेकांना धक्का बसला असून चित्रपटजगतातील मान्यवरांनीही या निर्णयाबद्दल आपली नाराजी जाहीर व्यक्त केली आहे. मात्र या सगळ्या वादंगाकडे दुर्लक्ष करत आपलाच निर्णय योग्य असल्याची पुनरुक्ती निहलानी यांनी केली आहे.

कोंकणा सेन शर्मा, रत्ना पाठक शहा यांच्यासारख्या सक्षम अभिनेत्रींची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाने विविध आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांतून आपला ठसा उमटवला आहे. टोकियो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘स्पिरिट ऑफ एशिया’ हा पुरस्कार मिळवणाऱ्या या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाकडून मात्र घरचा अहेर मिळाला आहे. महोत्सवातून चित्रपटाला लोकांच्या टाळ्या मिळत असल्या तरी प्रत्यक्षात चित्रपटगृहात असे चित्रपट पाहण्यासाठी सर्वसामान्य प्रेक्षक येत नाहीत, असा अजब दावा निहलानी यांनी केला आहे.

‘स्त्रियांचे चित्रण चुकीच्या पद्धतीने’

या चित्रपटातील ‘बुरखा’ या शब्दाला आपला आक्षेप नाही, मात्र चित्रपटातील आशय चुकीचा आहे. स्त्री सक्षमीकरणाच्या विरोधात मी नाही. पण त्यांचे चित्रण चुकीच्या पद्धतीने केले असेल तर बोर्डाच्या मार्गदर्शक नियमांनुसार त्याला प्रमाणित करता येणार नाही, असे निहलानी यांनी सांगितले. सेन्सॉर बोर्ड केवळ चित्रपट प्रमाणित करत नाही तर आपल्या कला आणि संस्कृतीचे जतन करण्याची जबाबदारीही बोर्डावर असल्याचे सांगून या चित्रपटाला प्रमाणित न करण्याच्या निर्णयावर आपण ठाम असल्याचे त्यांनी सांगितले.