कल्याणनजीक गीतांजली एक्स्प्रेसमध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे सध्या मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. या मार्गावरील ट्रेन्स सध्या १० ते १५ मिनिटे उशिराने धावत आहेत. काही वेळापूर्वीच हाती आलेल्या वृत्तानुसार आता गीतांजली एक्स्प्रेसमधील तांत्रिक बिघाड दुरूस्त झाला असून ती कल्याणकडे रवाना झाली आहे. मात्र, दरम्यानच्या काळात झालेल्या खोळंब्यामुळे मध्य रेल्वेच्या अप आणि डाऊन मार्गावरील गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले आहे. त्यामध्ये काही दिवसांच्या विलंबानंतर मुंबईत पुन्हा एकदा पावसाने जोर धरला आहे. मुंबई शहर, उपनगरांसह ठाणे जिल्ह्यात काल रात्रीपासूनच पावसाची संततधार सुरू आहे. तुर्तास तरी त्यामुळे रस्ते अथवा रेल्वे वाहतुकीचा खोळंबा झालेला नाही. परंतु पावसाची रिमझिम अशीच सुरू राहिल्यास अगोदरच तांत्रिक बिघाडामुळे कोलमडलेल्या मध्य रेल्वेच्या वाहतुकीला ऐन गर्दीच्या वेळात पावसाचा फटका बसण्याची शक्यता आहे.

लाईव्ह अपडेटस्
* गीतांजली एक्सप्रेसमधील बिघाड दुरुस्त… कल्याणकडे रवाना झाली ट्रेन
* मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत… गीतांजली एक्सप्रेसमधील बिघाडामुळे लोकल १० ते १५ मिनिटे उशिराने
* ठाणे, कल्याण, भिवंडी, डोंबिवलीत पावसाची हजेरी.
* मुंबई शहर आणि उपनगरात पहाटेपासून रिमझिम पावसाला सुरुवात.