उपनगरीय प्रवासासाठी प्रवाशांना आता थेट मोबाइलवरून तिकीट काढणे शक्य होणार आहे. त्यासाठी रेल्वे ‘आर-वॉलेट’ नावाची प्रणाली तयार करणार आहे. मोबाइलवरील या अ‍ॅपद्वारे ही तिकिटे काढणे शक्य होईल. या तिकिटांची छापील प्रत नसली, तरीही प्रवाशांना प्रवास करता येणार आहे. तसेच या अ‍ॅपद्वारे मासिक व त्रमासिक पासचे नूतनीकरणही करणे शक्य होईल.
रेल्वे बोर्ड सदस्य (वाहतूक) देवीप्रसाद पांडे यांनी या नव्या अ‍ॅपसंबंधी मुंबईत पत्रकारांना माहिती दिली. या प्रकल्पाचा पहिला टप्पा डिसेंबरअखेपर्यंत सुरू करण्यात येईल. सुरुवातीला फक्त काही स्थानकांच्या तिकिटांसाठीच ही सेवा सुरू करण्यात येईल. या सेवेला मिळणाऱ्या प्रतिसादाचा विचार करून नंतर या सेवेची व्याप्ती वाढवली जाईल. सध्या ही सेवा मध्य आणि पश्चिम रेल्वेमार्गावरील एकूण दहा स्थानकांवर लागू केली जाणार आहे. ही सेवा एका वर्षांसाठी प्रायोगिक तत्त्वावर राबवली जाईल, असेही पांडे यांनी सांगितले. ज्या स्थानकापासून तिकीट काढले आहे, तेथे असलेल्या एका मशीनवर हा कोड दाखवून तिकिटाची छापील प्रत मिळवता येणार आहे.आर-वॉलेटमध्ये पैसे भरण्यासाठी प्रवासी ऑनलाइन पद्धतीचा अवलंब करू शकतात किंवा प्रत्यक्ष तिकीट खिडकीवर जाऊनही आपले ‘वॉलेट’ भरू शकतात. तसेच ‘आर-वॉलेट’ बंद केल्यास त्यात असलेले पैसे प्रवाशांना परतही मिळू शकतात.

आर-वॉलेट
सध्या हे अ‍ॅप फक्त अँड्रॉइड आणि विंडोज प्रणालीच्या मोबाईलवरच वापरता येणे शक्य होणार आहे. ब्लॅकबेरी आणि आयफोन प्रणालीसाठी हे अ‍ॅप काही काळानंतर सुरू केले जाईल. तर साधे मोबाईल फोन वापरणारे प्रवासी *१३९# हा क्रमांक डायल करून ही सेवा वापरू शकतील. मात्र ही सेवा अँड्रॉइड फोनवर उपलब्ध झाल्यानंतर काही दिवसांनीच साध्या मोबाइल फोनधारकांसाठी उपलब्ध होईल. तिकीट काढताना पैसे भरण्यासाठी रेल्वेच्या आर-वॉलेट या संकल्पनेचा वापर करता येणार आहे. या संकल्पनेत प्रवाशांना या ‘आर-वॉलेट’मध्ये आधी पैसे भरावे लागतील. हे पैसे प्रवासी तिकीट काढण्यासाठी वापरू शकतील. तिकीट काढल्यानंतर प्रवाशांना एका एसएमएसद्वारे तिकिटाचा कोड पाठवला जाईल.