आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या तोंडावर महापौर स्नेहल आंबेकर यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. प्रभागांच्या फेररचनेमुळे स्नेहल आंबेकर यांच्या वाट्याला आलेल्या वॉर्ड क्रमांक १९८ मधून त्यांना उमेदवारी देण्यास स्थानिक शिवसैनिकांनी विरोध दर्शविला आहे. हे शिवसैनिक बुधवारी खासदार अनिल देसाई यांना भेटून याबाबतचे निवेदन देणार आहेत. यापूर्वीच्या निवडणुकीत स्नेहल आंबेकर वॉर्ड क्रमांक १९१ मधून विजयी झाल्या होत्या. मात्र, या निवडणुकीसाठी प्रभागांची फेररचना झाल्यामुळे आंबेकर यांना  वॉर्ड क्रमांक १९८ मधून लढावे लागणार आहे. मात्र, यापूर्वी या वॉर्डातून शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर विजयी झाल्या होत्या. त्यामुळे यावेळीही १९८ मधून त्यांनाच उमेदवारी मिळावी, असा स्थानिक शिवसैनिकांचा आग्रह आहे. त्यामुळे या शिवसैनिकांनी स्नेहल आंबेकर यांच्या नावाला विरोध दर्शविला आहे. यासाठी उद्या या वॉर्डातील गटप्रमुख आणि उपशाखाप्रमुख अनिल देसाई यांची भेट घेणार आहेत.
या निवडणुकीसाठी प्रभागांची फेररचना झाली आहे. या आरक्षण सोडतीमुळे पालिकेतील सर्वच प्रभागांची उलथापालथ झाली आहे. याचा फटका अनेक दिग्गज नगरसेवकांना बसला आहे. गील म्हणजे २०१२ मध्ये झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये अनुसूचित जातीसाठी ११ आणि अनुसूचित जमातीसाठी दोन प्रभाग राखून ठेवण्यात आले होते. यावेळी या आरक्षणासाठी प्रभाग संख्या १७ करण्यात आली आहे. अनुसूचित जातींसाठी प्रभाग क्रमांक २६, ५३, ९३, १२१, १४२, १४६, १५२, १५५, १६९, १७३, १९५, १९८, २००, २१० आणि २५५, तर अनुसूचित जमातींसाठी प्रभाग क्रमांक ५९ व ९९ आरक्षित करण्यात आले आहेत. यापैकी ५३,१२१,१४२,२००,२१० व २२५ हे प्रभाग महिला ‘एससी’ आणि ५९ हा प्रभाग महिला ‘एसटी’ उमेदवारांसाठी राखीव असतील.


ए (फोर्ट), बी (पायधुनी), सी (चंदनवाडी), डी (ग्रँट रोड) ई (भायखळा) या विभागातील प्रत्येकी एक, तर जी दक्षिण (प्रभादेवी) विभागातील दोन प्रभाग कमी होणार आहेत. पूर्व उपनगरात एम पूर्व (चेंबूर), एन (घाटकोपर) या दोन विभागातील प्रत्येकी एक प्रभाग कमी झाला असून एल (कुर्ला) आणि एस (भांडुप) विभागात एक प्रभाग वाढला आहे. याशिवाय एम पूर्व (मानखुर्द) विभागात दोन प्रभाग वाढले आहेत.
पश्चिम उपनगरात एच पूर्व (सांताक्रूझ) विभागातील एक प्रभाग कमी झाला आहे. तर पी दक्षिण (गोरेगाव) आणि आर उत्तर (दहिसर) या विभागातील प्रभागांची संख्या एकने वाढली आहे. तसंच पी उत्तर (मालाड), आर दक्षिण (कांदिवली) विभागात प्रत्येकी दोन प्रभाग वाढणार आहेत. नवीन प्रभागरचनेनुसार ५४ ते ५५ हजार लोकांमागे एक नगरसेवक असेल असा अंदाज आहे. सध्या बहुतांशी प्रभाग हे रेल्वेमार्गाच्या दोन्ही बाजूस विस्तारलेले आहे. त्यामुळे नवीन रचनेत रेल्वेमार्गामुळे प्रभाग छेदले जाणार नाही याची दक्षता घेण्यात आली आहे.