मेट्रोमुळे दुकाने बाधित होत असल्याने नाराजी; पुरेसा मोबदला मिळत नसल्याची तक्रार

मुंबईच्या विकासासाठी आवश्यक असलेल्या कुलाबा ते सिप्झ या मेट्रो-३च्या कामामुळे दक्षिण मुंबईतील सुमारे दीडशेहून अधिक व्यापाऱ्यांचे वर्तमान अंधारात जाणार आहे. मेट्रो-३ चे काम करणारी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन (एमएमआरसीएल) ही कंपनी आपल्या मागण्या मान्य करून योग्य तो न्याय देईल या प्रतीक्षेत ही मंडळी आहेत. याचबरोबर मागण्या मान्य झाल्याशिवाय जागा रिकामी न करण्याचाही निर्धार या व्यापाऱ्यांनी केला आहे. यामुळे मेट्रो-३च्या अडचणींत वाढ होणार आहे.

मुंबईच्या विकासाचा चेहरा समजला जाणारा मेट्रो-३ हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून तो पूर्ण करण्यासाठी राज्य सरकारने कंबर कसली आहे. मात्र हा पूर्ण करत असतानाच त्या मार्गात अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. दक्षिण मुंबईतील रहिवाशांप्रमाणेच व्यापारीही कंपनीने देऊ केलेल्या प्रस्तावावर समाधानी नसल्याने त्यांनीही आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. या प्रकल्पात दक्षिण मुंबईतील काही रहिवासी इमारती जमीनदोस्त कराव्या लागणार आहेत. यामध्ये रहिवासी तसेच व्यापारी दुकानेही आहेत. या प्रकल्पबाधित व्यापाऱ्यांना त्यांच्या सध्याच्या जागेपेक्षा २० टक्के अधिक जागा तसेच काम पूर्ण होईपर्यंत त्यांच्या दुकानाच्या जागेचे भाडे म्हणून रुपये २५ हजारपासून पुढे अशी रक्कम दिली जाणार आहे. मात्र कंपनीकडून काम पूर्ण होईपर्यंतच्या कालावधीत दिली जाणारी २५ हजार रुपयांची रक्कम ही फारच तुटपुंजी असून आमचे मासिक उत्पन्न किमान पन्नास हजाराच्या घरात आहे.

जागा बदलल्यामुळे व्यवसायावर परिणाम होणार असून पाच वर्षांच्या कालावधीत होणारे आमचे व्यावसायिक आर्थिक नुकसान कसे भरून निघणार, असा सवाल हे व्यापारी करत आहेत. आमच्या मासिक उत्पन्नाइतकी भरपाई नव्हे तर कंपनीने देऊ केलेले भाडे व आमचे उत्पन्न यातील सुवर्ण मध्य साधून आम्हाला पैसे मिळावे,’ अशी मागणी विठ्ठलदास सोसायटीतील अथर्व दुकानाचे मालक व व्यापाऱ्यांचे प्रतिनिधी गुरुकुमार शेटय़े यांनी केली. कंपनीकडून देण्यात येणारे पैसे फारच तुटपुंजे असून त्यात आमचा उदरनिर्वाह होऊच शकत नाही. एकतर पैसे वाढवून द्या, अन्यथा प्रकल्पबाधित म्हणून कंपनीच्या नोकरीत सामावून घ्या, अशी मागणी असल्याचे शेटय़े म्हणाले.  याबाबतचे लेखी निवेदन कंपनीकडे देणार असल्याचे शेटय़े म्हणाले.

‘मार्गदर्शक कंपनीचा संपर्क नाही’

या प्रकल्पात ज्या व्यापाऱ्यांच्या व्यवसायावर गदा येणार आहे. त्या व्यापाऱ्यांना त्यांच्या शिक्षणानुसार आणि कौशल्यांनुसार करिअर मार्गदर्शन करून उदरनिर्वाहासाठी योग्य ते साधन उपलब्ध करून देण्यासाठी कंपनीने एका खासगी कंपनीची स्थापना केली आहे. या कंपनीचे प्रतिनिधी तुमच्याशी संपर्क साधतील असे आम्हाला कंपनीतर्फे सांगण्यात आल्याचे शेटय़े यांनी सांगितले. मात्र आजपर्यंत कोणत्याही कंपनीने संपर्क साधला नसल्याचेही त्यांचे म्हणणे आहे.