मोबाइलवर काढलेल्या तिकिटाची एटीव्हीएम यंत्रावर मुद्रित प्रत मिळणार

उपनगरीय रेल्वेमार्गावरील तिकीट खिडकीच प्रवाशांच्या हाती सोपवणाऱ्या ‘यूटीएस ऑन मोबाइल’ हे अ‍ॅप्लिकेशन अधिक लोकप्रिय करण्यासाठी आता या अ‍ॅपवरून काढलेल्या तिकिटाची छापील प्रत घेण्याची सुविधा सेंटर फॉर रेल्वे इन्फर्मेशनने (क्रिस) उपलब्ध करून दिली आहे. या सुविधेमुळे आता मोबाइलवरून तिकीट काढण्यासाठी असलेली ३० मीटर हद्दीची अटही शिथिल करण्यात आली आहे. मोबाइलवरून तिकीट काढल्यानंतर एटीव्हीएम यंत्रावर मोबाइल क्रमांक आणि एसएमएसद्वारे आलेला कोड टाकावा लागणार आहे. त्यानंतर छापील प्रत प्रवाशांच्या हाती येईल.

रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी डिसेंबर २०१५मध्ये दादर रेल्वे स्थानकात मोबाइल तिकीटप्रणालीची सुरुवात केली होती. सुरुवातीला मोबाइल तिकिटाची छापील प्रत घेण्याची सुविधा देण्यात आली होती. त्यानंतर कागदविरहित तिकीटप्रणालीची सुरुवात केल्यावर रेल्वेने छापील प्रत घेण्याची सुविधा बंद केली होती. पण कागदविरहित मोबाइल तिकीटप्रणालीला प्रवाशांचा म्हणावा तसा प्रतिसाद न मिळाल्याने आता पुन्हा तिकिटाची छापील प्रत मिळवून देण्याची सुविधा सुरू केल्याचे ‘क्रिस’च्या मुंबई विभागाचे व्यवस्थापक उदय बोभाटे यांनी स्पष्ट केले.

मोबाइलवरून तिकीट काढण्यासाठी अ‍ॅण्ड्रॉइड आणि विंडोजप्रणाली असलेले मोबाइल आणि त्यावर इंटरनेट असणे आवश्यक आहे. त्यानंतर ‘यूटीएस ऑन मोबाइल’ हे अ‍ॅप डाउनलोड करायचे आहे. त्यावर आपला मोबाइल क्रमांक नोंदवून खाते तयार करायचे आहे. आतापर्यंत या अ‍ॅपवरून तिकीट काढण्यासाठी रेल्वेच्या हद्दीपासून ३० मीटर लांब जाण्याची आवश्यकता होती. आता छापील तिकिटांसाठी ही हद्द रद्द करण्यात येणार आहे. म्हणजेच स्थानकावर उभे राहूनही या अ‍ॅपवरून छापील तिकीट काढता येऊ शकते. हे तिकीट काढल्यानंतर प्रवाशांना एक संकेत क्रमांक एसएमएसद्वारे प्राप्त होईल. हा संकेत क्रमांक आणि मोबाइल क्रमांक एटीव्हीएम यंत्रावर टाकल्यानंतर छापील तिकीट घेता येणार आहे, असेही बोभाटे यांनी सांगितले.

या अ‍ॅपमुळे केवळ मोबाइल अ‍ॅपधारकांनाच नाही, तर त्यांच्या नातेवाईकांनाही तिकीट प्राप्त होऊ शकेल. सध्याच्या अ‍ॅपवर कागदविरहित तिकीट फक्त मोबाइलधारकाला उपलब्ध होते. पण आता या तिकिटाची छापील प्रत मिळणार असल्याने एखाद्या मोबाइलवरून तिकीट काढल्यावर तो मोबाइल क्रमांक आणि तिकिटापोटी आलेला संकेत क्रमांक आपल्या नातेवाईकांना देऊन तिकिटाची छापील प्रत घेणे शक्य होणार आहे.

कागदविरहित तिकीट प्रणालीला अल्प प्रतिसाद

सध्या ‘युटीएस ऑन मोबाइल’ हे अ‍ॅप वापरणाऱ्यांची संख्या ३,१८,२५६ एवढी आहे. उपनगरीय रेल्वेमार्गावरील एकूण प्रवाशांची संख्या लक्षात घेता हा आकडा अत्यल्प आहे. त्याशिवाय मध्य रेल्वेवर दर दिवशी सरासरी २६९६ मोबाइल तिकिटांद्वारे ३५०२ प्रवासी आणि पश्चिम रेल्वेवर १६४१ तिकिटांद्वारे २२४४ प्रवासी प्रवास करत आहेत.