राज्यभरातील महाविद्यालये ‘लोकांकिका’मय ल्लअर्ज सादर करण्याची अंतिम मुदत २५ सप्टेंबर
‘गेल्या वर्षी आमच्या म. ल. डहाणूकर महाविद्यालयाच्या ‘बीइंग सेल्फिश’ या एकांकिकेने महाअंतिम फेरीत बाजी मारली होती. आम्हाला तिसरे पारितोषिकही मिळाले होते. या स्पर्धेत राज्यभरातील महाविद्यालयांतील एकांकिकांमध्ये चुरस असते. महाअंतिम फेरीतही राज्यातील आठ एकांकिका एकमेकींसमोर असतात. हेच या स्पर्धेचे मोठे वैशिष्टय़ आहे. मात्र यंदा आम्ही आमची एकांकिका ‘महाराष्ट्राची लोकांकिका’ म्हणून सिद्ध करण्यासाठी कंबर कसली आहे. गेल्या वर्षीप्रमाणेच यंदाही आमच्यातीलच विद्यार्थी लेखकांनी एक नवीन एकांकिका लिहिली असून तिच्या तालमी आठ-आठ तास सुरू आहेत. एका नव्या जिद्दीने आम्ही या स्पर्धेत उतरणार आहोत..’ म. ल. डहाणूकर महाविद्यालयाच्या मंजिरी दातेची ही प्रतिक्रिया अत्यंत बोलकी आणि प्रातिनिधिक आहे.
सॉफ्ट कॉर्नर प्रस्तुत आणि पृथ्वी एडिफिस यांच्या सहकार्याने होणाऱ्या ‘लोकसत्ता लोकांकिका’ या स्पर्धेसाठी राज्यभरातील शेकडो महाविद्यालयांमध्ये अशीच चुरस सुरू आहे. लेखकांनी नवी कोरी एकांकिका लिहिल्यावर ती रंगमंचावर
मूर्त स्वरूपात साकारण्यासाठी, तिला नेपथ्य, प्रकाशयोजना, संगीत आदी अंगांनी नटवण्यासाठी कलाकार सज्ज झाले आहेत. मात्र आतापर्यंत या स्पर्धेचा अर्ज भरला नसाल, तर अर्ज भरण्याची अंतिम तारीख २५ सप्टेंबर आहे, याकडे लक्ष द्या. सॉफ्ट कॉर्नर प्रस्तुत आणि पृथ्वी एडिफिस यांच्या सहकार्याने होणाऱ्या ‘लोकसत्ता लोकांकिका’ या स्पर्धेला यंदा टेलिव्हिजन पार्टनर म्हणून झी मराठी नक्षत्र आणि प्राथमिक फेरीसाठी रेडिओ पार्टनर म्हणून ९३.५ रेड एफ एम काम लाभले आहेत. तसेच यंदा नॉलेज पार्टनर म्हणून स्टडी सर्कल आणि टॅलेण्ट पार्टनर म्हणून आयरिस प्रॉडक्शन काम पाहणार आहेत.
ही स्पर्धा गेल्या वर्षीप्रमाणेच यंदाही मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, रत्नागिरी, औरंगाबाद, अहमदनगर, नागपूर या आठ केंद्रांवर होतील. या स्पर्धेची प्राथमिक फेरी २९ सप्टेंबरपासून सुरू होणार असून या फेरीतून प्रत्येक केंद्रावरील केंद्रीय अंतिम फेरीसाठी एकांकिका निवडल्या जातील.
या केंद्रीय अंतिम फेरीत अव्वल ठरलेल्या आठ एकांकिका १७ ऑक्टोबर रोजी मुंबईत होणाऱ्या महाअंतिम फेरीत सादर होतील. या फेरीतून निवडलेल्या महाराष्ट्राच्या लोकांकिकेला ज्येष्ठ नाटककार महेश एलकुंचवार यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात येणार आहे.

या स्पर्धेचे अर्ज, इतर माहिती आणि नियम व अटीloksatta.com/lokankika 2015 या संकेतस्थळावर उपलब्ध असतील.