यंदाच्या पावसाळ्यात महापालिकेच्या शीव रुग्णालयाच्या इमारतीत जागोजागी गळती होणार होऊन त्याचा फटका रुग्णांना बसू शकतो तसेच अपघात विभागाच्या जुन्या इमारतीत डळमळीत झालेल्या छताचा भाग काही ठिकाणी कोसळू शकतो अशी भीती येथील डॉक्टरांकडून व्यक्त करण्यात येत आहे. ‘लोकसत्ता’ने या विषयाला वाचा फोडल्यानंतर जागे झालेले आयुक्त अजोय मेहता यांनी मंगळवारी अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त, अभियंते तसेच रुग्णालय संचालक व अधिष्ठात्यांची बैठक आयोजित केली आहे.

महापालिकेच्या शीव, नायर तसेच केईएमसह अनेक रुग्णालयांच्या इमारती जुन्या असून अनेक विभागांत तातडीच्या दुरुस्तीची गरज आहे. शीव रुग्णालयाच्या अपघात व बाहय़रुग्ण विभागाची इमारत सत्तरच्या दशकातील असून त्या इमारतीसह पालिकेच्या अन्य रुग्णालयांच्या इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट केले आहे का, असा सवाल भाजपचे आमदार योगेश सागर यांनी आयुक्त मेहता यांना एका पत्राद्वारे केला आहे. दरवर्षी पावसाळ्यात पालिका मुंबईतील अनेक इमारतींची तपासणी करून धोकादायक इमारती जाहीर करत असते. असे ऑडिट पालिका रुग्णालयांचे केले आहे का व नसल्यास तपासणी न करणाऱ्यांवर काय कारवाई करणार, असा सवालही योगेश सागर यांनी केला आहे. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनीही ‘लोकसत्ता’च्या बातमीची दखल घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून याप्रकरणी चौकशी करण्याची मागणी केली आहे.  दरम्यान, आयुक्त अजोय मेहता यांनी मंगळवारी याबाबत पालिका मुख्यालयात बैठक आयोजित केली आहे.

गेले वर्षभर हृदयविकार विभागातील दुरुस्तीचे कामच झाले नसेल तर त्याला जबाबदार कोण हे आयुक्तांनी स्पष्ट केले पाहिजे.शीव रुग्णालयातील कमालीच्या अस्वच्छतेला आयुक्त व अतिरिक्त आयुक्तांची सफाई कामगार देण्यातील आडकाठी जबाबदार असल्याचे भाजपचे आमदार योगेश सागर यांनी सांगितले.