ठाण्यात १५ व १६ सप्टेंबरला लोकसत्ता आरोग्यमान भव

निरोगी आयुष्यासाठी आहाराबरोबरच जीवनशैलीच्या योग्य सवयी लावून घेतल्या तर आरोग्याच्या अध्र्याअधिक समस्या आटोक्यात येतात. मात्र निरोगी आयुष्यासाठी आवश्यक असलेल्या नेमक्या सवयी कोणत्या, त्यांची अंमलबजावणी कशी करावी, शरीरासोबतच मनाचे आरोग्य कसे जपावे याचा सल्ला ‘लोकसत्ता आरोग्यमान भव’ या परिसंवादामध्ये दिला जाणार आहे.

येत्या शुक्रवारी व शनिवारी सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत ठाणे येथे हा परिसंवाद होईल. शरीर व मनाने कुरकुर सुरू केली की आरोग्याचे महत्त्व लक्षात येते. त्यानंतर आरोग्य जपण्याबाबत ओळखीच्या लोकांकडून सल्ले मिळणेही सुरू होते. यातील नेमके कोणते सल्ले ऐकावेत आणि त्याहून महत्त्वाचे म्हणजे ते अमलात कसे आणावेत याबद्दल मनात शंका असतात. या शंका थेट संबंधित विषयातील तज्ज्ञ व्यक्तींना विचारण्याची संधी या परिसंवादातून प्रेक्षकांना मिळेल. आरोग्य जपण्यासाठी त्याकडे पाहण्याच्या दृष्टिकोनात बदल करणे आवश्यक आहे. समाजाच्या आरोग्याविषयीच्या बदलत्या गरजांचे भान ठेवून ‘आरोग्यमान भव’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हृदयाचा मार्ग जसा पोटातून जातो तसाच निरोगी आयुष्याचा मार्गही पोटातूनच जातो. उदरभरण नोहे.. हे माहीत असले तरी जिभेचे लाड पुरवण्याच्या नादात त्याकडे सोईस्कर दुर्लक्ष होते. मात्र आयुर्वेदात आहार व जीवनशैलीला अत्यंत महत्त्व देण्यात आले असून हा ‘उदर- मतवाद’ समजून घेतला की अनेक समस्या परस्पर सुटतात. वैद्य अश्विन सावंत हा उदर-मतवाद समजावून देतील. शारीरिक व मानसिक या दोन्ही पातळ्यांवर निरोगी आयुष्य जगण्यासाठी जीवनशैलीत सकारात्मक बदल करावे लागतात. प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधी उतार चढाव येतात. या घटनांकडे कसे पाहावे, मानसिक समतोल कसा ठेवावा याबाबत केईएम रुग्णालयाच्या मानसोपचार विभाग प्रमुख डॉ. शुभांगी पारकर ‘जगू आनंदे’चा मंत्र देणार आहेत.

कुटुंबातील सर्वाच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या स्त्रियांनीही स्वत:ची काळजी घेण्याची गरज आहे. किशोरवयापासून वृद्धापकाळापर्यंत स्त्रियांच्या शरीरात कोणते व का बदल होतात हे लक्षात घेतले की स्त्रियांच्या दुखण्याचे मर्म उलगडते. स्त्रीआरोग्याच्या क्षेत्रात ३५ हून अधिक वर्षांचा अनुभव असलेल्या डॉ. रेखा डावर या कुटुंबाच्या आरोग्याची दोरी सांभाळणाऱ्या स्त्रियांना स्वत:च्या आरोग्याची काळजी घेण्याबाबत सल्ले देणार आहेत.

ठाण्यातील टिप टॉप प्लाझा येथे शुक्रवारी व शनिवारी सकाळी दहा ते दुपारी तीन या वेळेत होणाऱ्या या परिसंवादासाठी ३० रुपये प्रति व्यक्ती असे शुल्क आहे. कार्यक्रमाच्या प्रवेशिका सोमवारपासून उपलब्ध होतील. प्रवेशिकांसाठी लोकसत्ता, कुसुमांजली, दुसरा मजला, गोखले रोड, नौपाडा, ठाणे (प) किंवा टिप टॉप प्लाझा, एल.बी.एस. मार्ग, ठाणे (प.) येथे संपर्क साधावा. ऑनलाइन नोंदणीसाठी https://www.townscript.com/e/loksatta-aarogyaman-bhav-thane-401324 या संकेत स्थळाला भेट द्या.