नव्या आर्थिक वर्षांसाठी गुंतवणूकविषयक मार्गदर्शन व ‘लोकसत्ता-अर्थब्रह्म’ वार्षिकांकाचे प्रकाशन

२९ हजारानजीक पोहोचलेला सेन्सेक्स, १७ लाख कोटी रुपयांवर गेलेला म्युच्युअल फंड उद्योग, घसरत जाणारे बचत ठेवींवरील व्याजदर, कमी होत असलेले गृह कर्ज व्याजदर, सोने- चांदीतील लुप्त होणारी परतावाचकाकी आणि येऊ घातलेले नवे वित्त वर्ष.  या पाश्र्वभूमीवर बचतीची आर्थिक शिस्त बदलावी काय? कोणत्या पर्यायाला गुंतवणुकीसाठी कितपत झुकते माप द्यावे? अशा साऱ्यांच्या प्रश्नांची उत्तरे प्रत्यक्ष नवे आर्थिक वर्ष सुरू होण्यापूर्वी च तुम्हाला मिळणार आहे.

‘लोकसत्ता अर्थब्रह्म’चा चौथा वार्षिकांक तसेच या नियतकालिकाच्या प्रकाशनाच्या निमित्ताने आयोजित गुंतवणूक मार्गदर्शन त्यासाठी सज्ज आहे. ‘बिर्ला सन लाईफ म्युच्युअल फंड’ प्रस्तुत व गजराज बिल्डर्स, वास्तू रविराज सहप्रायोजक असलेला हा गुंतवणूक जागर येत्या मंगळवार, २८ फेब्रुवारी २०१७ रोजी सायंकाळी ६ वाजता रवींद्र नाटय़मंदिर, प्रभादेवी, दादर (पश्चिम), मुंबई येथे होणार आहे. पॉवर्ड बाय पार्टनर एलआयसी हाऊसिंग फायनान्स लिमिटेड, केसरी टुर्स, पुराणिक बिल्डर्स व जनकल्याण सहकारी बँक बँकिंग पार्टनर असलेल्या या कार्यक्रमासाठी सर्वाकरिता प्रवेश खुला व विनामूल्य आहे. मात्र निमंत्रितांसाठी काही जागा राखीव आहेत. या कार्यक्रमा दरम्यान उपस्थित तज्ज्ञांकडून गुंतवणूकदारांना आपल्या बचतीविषयीच्या शंकांचे समाधान करून घेण्याची संधी उपलब्ध आहे.

arth-chart

‘लोकसत्ता अर्थब्रह्म’च्या २०१७-१८ साठीच्या अंकाचे प्रकाशन यावेळी होईल. या अंकातून स्पष्ट करण्यात आलेले नव्या आर्थिक वर्षांसाठी झालेले गुंतवणूक, बचतविषयीचे बदल यावेळी अधोरेखित केले जातील. तसेच भांडवली बाजार, अर्थनियोजन, करबचत आदी विषयांवर तज्ज्ञांचे मार्गदर्शन होईल.

अजय वाळिंबे, तृप्ती राणे, प्रवीण देशपांडे आदी गुंतवणूकविषयीच्या विविध पर्यायांवर भाष्य करतील.

काही उदाहरणांसह तज्ज्ञ यावेळी गुंतवणुकीचे विविध पर्याय, त्यातील परतावा, जोखीम आदींचा उहापोह करतील. संपूर्ण नव्या आर्थिक वर्षांची वाटचाल अधिक लाभकारक कशी होईल, हेहि या वेळी स्पष्ट केले जाणार आहे.