‘लोकसत्ता अर्थसल्ला’ उपक्रमात रविवारी बोरिवलीत तज्ज्ञांशी संवादाची संधी

निश्चलनीकरण आणि पर्यायाने रोकडरहित अर्थव्यवस्थेतील संक्रमणाचे सहा महिने लोटले आणि आता देशस्तरावर एक सामाईक बाजारपेठ घडविणारी वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) नावाची नवीन करप्रणाली येऊ घातली आहे. अर्थव्यवस्थेतील या मोठय़ा संक्रमणातूून तुम्ही गुंतवणूक केलेल्या पैशाचे भवितव्य बदलेल तर ते कसे? यातून आपल्या पैशाची भविष्यात वृद्धी होईल तर ती कशी या सर्वसामान्यांना पुढे असणाऱ्या प्रश्नाचे समाधान ‘लोकसत्ता अर्थसल्ला’ उपक्रमातून तज्ज्ञ सल्लागारांद्वारे केले जाणार आहे.

‘रिलायन्स म्युच्युअल फंड’ प्रस्तुत गुंतवणूकदार मार्गदर्शनाच्या ‘लोकसत्ता अर्थसल्ला’चे हे सत्र पुन्हा नव्याने येत्या रविवारी, २५ जून २०१७ रोजी सकाळी १०.३० वाजता सेंट अ‍ॅन्स हायस्कूल, लोकमान्य टिळक रोड, सावरकर उद्यानाजवळ बोरिवली (पश्चिम) येथे आयोजित करण्यात आले आहे. बदलत्या आर्थिक परिमाणांतून निर्माण झालेल्या कुटुंबाच्या अर्थनियोजन आणि गुंतवणूकविषयक शंकांचे निवारण करण्याचा हा एक प्रयत्न आहे.

lok-chart

शेअर बाजार निर्देशांकांनी विक्रमी शिखर गाठले आहे, तिमाहीगणिक जाहीर होणाऱ्या कंपन्यांचे निकालातील फेरउभारी स्पष्टपणे दिसून येत आहे. तर दुसरीकडे रिझव्‍‌र्ह बँकेने महागाई वाढीचा इशारा देत व्याज दरात कपातीला लगाम घातला आहे. बँकांच्या मुदत ठेवी आणि अल्पबचत योजनांच्या लाभाला यातून उतरती कळा लागली आहे. अशा स्थितीत गुंतवणुकीच्या सुयोग्य पर्यायांची मांडणी या कार्यक्रमात, अजय वाळिंबे आणि वसंत माधव कुलकर्णी या दोन तज्ज्ञ सल्लागारांकडून केली जाणार आहे.

कार्यक्रमाला उपस्थित गुंतवणूकदारांना त्यांच्या मनांतील प्रश्न थेट तज्ज्ञ वक्त्यांना विचारून त्याचे समाधान करून घेता येईल. कार्यक्रमाला प्रवेश सर्वासाठी खुला आणि विनामूल्य असून प्रथम येणाऱ्यास प्राधान्य दिले जाईल.