‘लोकसत्ता अर्थसल्ला’ उपक्रमात रविवारी बोरिवलीत तज्ज्ञांकडून मार्गदर्शन

नोटाबंदीनंतरचे अर्थचित्र स्थिरावत असतानाच आता वस्तू व सेवा कर (जीएसटी) अंमलबजावणीने पुन्हा अर्थव्यवस्थेत हालचाल नोंदविली जाणार आहे. पैशाशी निगडित व्यवस्थेचे सातत्यातील बदल असेच कायम राहणार आहे. मात्र अशा स्थितीत गुंतवणुकीवरील स्थिर किंवा हमखास परताव्याची हमी कोणत्या पर्यायात आहे, याचे उत्तर रविवारी मिळणार आहे.

chart

‘रिलायन्स म्युच्युअल फंड’ प्रस्तुत गुंतवणूकदार मार्गदर्शनाच्या ‘लोकसत्ता अर्थसल्ला’चे सत्र नव्याने येत्या रविवारी, २५ जून २०१७ रोजी सकाळी १०.३० वाजता सेंट अ‍ॅन्स हायस्कूल, लोकमान्य टिळक रोड, सावरकर उद्यानाजवळ बोरिवली (पश्चिम) येथे पार पडत आहे. बचत, गुंतवणूक, कर आदी बदलत्या व्यवस्थेशी कसे जुळवून घेता येईल, याचे मार्गदर्शन यावेळी तज्ज्ञांकडून केले जाणार आहे. गुंतवणूकदारांच्या शंकांचे समाधान यावेळी प्रश्नोत्तराच्या माध्यमातून केले जाईल. कार्यक्रमासाठी प्रवेश सर्वाना खुला असेल.

मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स तसेच राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी आता सर्वोच्च स्तरानजीक आहे. सोने, स्थावर मालमत्तेचे दरही आता स्थिरावत आहेत. कंपन्यांच्या तिमाही वित्तीय निष्कर्षांला आगामी मान्सूनची साथ मिळेल. तर कठोर नियम व कारवाईकडे पडलेल्या पावलांमुळे बँकांचे ताळेबंदही सुधारण्याच्या स्थितीत आहेत. फेडरल रिझव्‍‌र्ह, ओपेकची बैठक या रूपात आता आंतरराष्ट्रीय घडामोडींची अस्थिरताही जवळपास संपुष्टात आली आहे.

अशा स्थितीत गुंतवणूकविषयक विविध पर्यायांकडून काय अपेक्षा करता येईल हे संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञ ‘लोकसत्ता अर्थसल्ला’च्या मंचावर स्पष्ट करतील. शेअर बाजार, म्युच्युअल फंड, बँकांच्या – पोस्टाच्या ठेवी, विमा तसेच सोने, जागा आदींमध्ये गुंतवणुकीबाबत काय धोरण असावे, हे यावेळी नमूद केले जाईल. अर्थनियोजनाबाबत अजय वाळिंबे तर शेअर गुंतवणुकीबाबत वसंत माधव कुलकर्णी मार्गदर्शन करतील.