‘लोकसत्ता अर्थसल्ला’ उपक्रमात आज ठाणेकरांशी संवाद

काळ्या पैशाविरूद्ध लढाईसाठी सरकारने उगारलेल्या निश्चलनीकरण अस्त्राने चलनाच्या टंचाईचा आपल्याला अजूनही सामना करावा लागत आहे. परंतु यातून आपले गुंतवणुकीचे समीकरणही बिघडले काय, यावर ‘लोकसत्ता अर्थसल्ला’ उपक्रमातून रविवारी ठाण्यात  तज्ज्ञ सल्लागारांकडून मार्गदर्शन केले जाणार आहे.

अर्थसाक्षरतेच्या उद्देशाने योजलेला हा गुंतवणूकदार मार्गदर्शनाचा कार्यक्रम ‘बिर्ला सन लाईफ म्युच्युअल फंड’ प्रस्तुत असून, नोटाबंदीतून साधल्या गेलेल्या आर्थिक परिणामांतून बदललेल्या गुंतवणूक चक्राविषयी यातून दिशादर्शन केले जाणार आहे. ‘लोकसत्ता अर्थसल्ला’चे हे सत्र रविवार, २२ जानेवारी २०१७ रोजी सकाळी १०.३० वाजता कांती विसारिया हॉल, महर्षी कर्वे रोड, बेडेकर हॉस्पिटलसमोर, गावदेवी मैदानाजवळ, नौपाडा, ठाणे (प.) येथे आयोजित करण्यात आले आहे.

गुंतवणुकीचा लोकप्रिय पर्याय असलेल्या म्युच्युअल फंडासंबंधी गुंतवणूक धोरण कसे असावे, याबाबत अर्थसल्लागार सुयोग काळे हे या कार्यक्रमांत मार्गदर्शन करतील. कोणत्या फंड प्रकारात सध्या गुंतवणूक उपयुक्त ठरेल आणि फंडांची निवड कोणत्या निकषावर करावी यावर ते प्रकाश टाकतील.

अनिश्चितता व संभ्रमाचे वातावरण असले तरी  बचत आणि गुंतवणूक ही निरंतर सुरू राहणे आवश्यक असलेली प्रक्रिया आहे. भविष्यासाठी ठरविलेल्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी आर्थिक नियोजन कसे करावे, यावर या चर्चासत्रात सनदी लेखाकार तृप्ती राणे या मार्गदर्शन करतील. आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर बदलत्या जबाबदाऱ्यांसह उत्पन्न, खर्च यांचा मेळ राखत आर्थिक नियोजनाची घडी यातून बसवली जाऊ शकते हे त्या सोदाहरण पटवून देतील.

‘लोकसत्ता अर्थसल्ला’ कार्यक्रम सर्वासाठी खुला व मोफत असून, उपस्थितांना तज्ज्ञ वक्त्यांना या कार्यक्रमांत आपले गुंतवणूकविषयक प्रश्न विचारण्याचीही संधी मिळेल.

untitled-30