बोरिवलीत आज ‘लोकसत्ता अर्थसल्ला’मध्ये मार्गदर्शन

शेअर बाजार निर्देशांकांनी विक्रमी शिखर गाठले आहे, तिमाहीगणिक जाहीर होणाऱ्या कंपन्यांचे निकालही फेरउभारी दर्शवीत आहेत. काळ्या पैशाच्या बंदोबस्तासाठी निश्चलनीकरण आणि आता वस्तू व सेवा कराच्या रूपाने करव्यवस्थेला शिस्त लागणार आहे. अर्थव्यवस्थेतील या संक्रमणाचा लाभ घेण्यासाठी गुंतवणुकीचा आगामी पथ कसा असावा हे ‘लोकसत्ता अर्थसल्ला’च्या व्यासपीठावर रविवारी उलगडणार आहे.

‘रिलायन्स म्युच्युअल फंड’ प्रस्तुत ‘लोकसत्ता अर्थसल्ला’ हे गुंतवणूकदार मार्गदर्शनपर सत्र रविवारी, २५ जून २०१७ रोजी सकाळी १०.३० वाजता सेंट अ‍ॅन्स हायस्कूल, लोकमान्य टिळक रोड, सावरकर उद्यानाजवळ बोरिवली (पश्चिम) येथे पार पडणार आहे. सर्वसामान्यांसाठी महत्त्वाचे असलेले अर्थनियोजन तसेच शेअर बाजारातील व्यवहार यावर मार्गदर्शन या निमित्ताने तज्ज्ञ वक्ते करतील.

‘लोकसत्ता अर्थ वृत्तान्त’चे स्तंभलेखक अजय वाळिंबे आणि वसंत माधव कुलकर्णी यांच्याकडून यावेळी गुंतवणूकदारांच्या शंकांचे निरसनही केले जाणार आहे. या कार्यक्रमासाठी प्रवेश सर्वासाठी खुला आणि विनामूल्य असून प्रथम येणाऱ्यास प्राधान्य दिले जाईल.

आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर बदलत्या जबाबदाऱ्यांसह उत्पन्न, खर्च यांचा मेळ राखत  आर्थिक नियोजनाची घडी बसवली जाणे क्रमप्राप्तच आहे. त्यासाठी गुंतवणुकीचे व्रत स्वीकारून त्याचे पालन आवश्यकच ठरेल. गुंतवणुकीचा सध्याच्या या सर्वात लोकप्रिय पर्यायाबाबत आपले धोरण कसे असावे, कोणत्या फंड प्रकारात सध्या गुंतवणूक उपयुक्त ठरेल आणि फंडांची निवड कोणत्या निकषावर करावी अशा लोकांच्या मनातील प्रश्नांचे निवारण या कार्यक्रमातून केले जाईल.

untitled-23

Disclaimer: Mutual fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.