पनवेलमध्ये आज ‘लोकसत्ता-अर्थसल्ला’ मार्गदर्शन

कमी भावात खरेदी आणि उच्च मूल्याला विक्री हा आदर्श गुंतवणूकधर्म आहे. परंतु तो सर्वानाच लाभत नसतो. वाढलेल्या परताव्याचे लाभ प्रत्येक गुंतवणूकदारांच्या वाटय़ाला येतेच असे घडत नसते. तर मग या अशा गुंतवणुकीचा मार्ग कोणता, गुंतवणुकीतून जास्त आणि तरीही सुरक्षित परताव्याच्या उत्तरासाठी ‘लोकसत्ता अर्थसल्ला’चा गुंतवणूकमंत्र रविवारी, २ ऑक्टोबरला सकाळी पनवेलकरांना उपलब्ध होत आहे.

‘कोटक म्युच्युअल फंड’ प्रस्तुत हा गुंतवणूकदारांसाठी मार्गदर्शनपर कार्यक्रम सकाळी १०.३० वाजता पनवेल येथील वासुदेव बळवंत फडके नाटय़गृहात आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमासाठी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य तत्त्वावर विनामूल्य प्रवेश दिला जाईल.

सुयोग्य आर्थिक नियोजन केले वयाच्या चाळीशीतही स्व-मालकीचे घर, गाडी घेण्याचे स्वप्न साकारता येऊ शकते. म्हणूनच या कार्यक्रमात सनदी लेखाकार तृप्ती राणे या ‘आर्थिक नियोजनातून स्वप्नपूर्ती’चे दिशादर्शन करतील.

विशेषत: सध्या सुरू असलेल्या नवरात्रौत्सवात त्या स्त्रियांच्या हाती कुटुंबाच्या गुंतवणुकीची किल्ली सोपविल्यास कोणती किमया घडू शकते याचे सोदाहरण दाखले उपस्थितांपुढे मांडतील.

थेंबे थेंबे तळे साचे या प्रचलित म्हणीप्रमाणे गुंतवणुकीचे मोठय़ा कालावधीसाठी सातत्य राखल्यास इच्छित संपत्तीनिर्मिती कुणालाही शक्य आहे. आजच्या घडीला अल्पतम गुंतवणुकीतून, किमान जोखीम असलेला आणि दीर्घ मुदतीत चांगला लाभ मिळवून देणारा गुंतवणुकीचा पर्याय म्हणून म्युच्युअल फंडांकडे पाहिले जाते. म्हणूनच ‘म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीचे फायदे’ या विषयावर या कार्यक्रमांत गुंतवणूकविषयकसल्लागार आणि ‘अर्थ वृत्तान्त’चे स्तंभलेखक वसंत माधव कुलकर्णी यांचे उपस्थितांना मार्गदर्शन होईल.

‘लोकसत्ता-अर्थसल्ला’च्या उपक्रमांतून सोप्या भाषेत, सुबोध उदाहरणांसह, तज्ज्ञांकडून दिले जाणारे मार्गदर्शन उपस्थितांना निश्चितच उपयुक्त ठरेल. शिवाय आपले नेमके प्रश्न तज्ज्ञांना विचारण्याची संधीही असेल. कार्यक्रमाला प्रवेश खुला व विनामूल्य आहे.

अस्वीकृती: Mutual fund investments are subject to market risks. Please read the scheme information and other related documents before investing.