शेअर निर्देशांक अर्थात ‘सेन्सेक्स’ने पुन्हा २६ हजाराला गाठले. सलग चार वर्षांच्या मंदीनंतरचा शेअर बाजाराचा मूडपालट लक्षणीय असला तरी आपल्याला लाभ देणारा ठरेल काय? गुंतवणुकीतील नफ्याचा टक्का उंचावत असल्याचे पाहण्याची सवय आता आपण स्वत:ला लावून घ्यावीच़ या कामी ‘लोकसत्ता’ तुमची सोबत करेल.
मराठी वाचकांच्या अर्थसाक्षरतेसाठी नेहमीच सजग असलेल्या ‘लोकसत्ता’ने गुंतवणूकविषयक सर्वागीण मार्गदर्शक ‘अर्थब्रह्म’ या वार्षिकांकाच्या प्रकाशनानिमित्त गुंतवणूकदारांना मार्गदर्शन मेळावाही आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमानिमित्ताने वाचकांना तज्ज्ञांशी थेट संवादाची व शंकानिरसनाची संधीही मिळणार आहे.
गोखले अ‍ॅण्ड साठे चार्टर्ड अकाऊंटंट्सचे भागीदार सीए जयंत गोखले, ‘लोकसत्ता-अर्थवृत्तान्त’चे स्तंभलेखक व कंपनी सचिव अजय वाळिंबे व ‘सिबिल’ या ऋण संदर्भ संस्थेच्या ग्राहक संबंध विभागाच्या प्रमुख हर्षला चांदोरकर हे तज्ज्ञ गुंतवणूकदारांना मार्गदर्शन करतील़
शेअर बाजाराला हवे ते स्थिर सरकार मिळाले आहे. पर्यायाने दीर्घकालीन तेजीच्या दिशेने बाजार अग्रेसर आहे. बाजारात नफ्याच्या संधी यापुढेही आहेत. ताज्या अर्थसंकल्पाने तर करवजावटीसाठी जास्तीच्या गुंतवणुकांची मुभा दिली आहे. या सर्वाविषयी उपयुक्त मार्गदर्शनही या कार्यक्रमानिमित्ताने केले जाईल. केवळ शेअर गुंतवणूकच नव्हे, तर प्रत्येकाला त्याच्या जोखीमक्षमतेनुसार पेलेल- रुचेल असे भविष्य निर्वाह निधी, म्युच्युअल फंड, पेन्शन, डेरिव्हेटिव्हज्, जमीनजुमला ते सोने व मौल्यवान धातूंपर्यंतच्या गुंतवणुकीचा विविधांगी पट खुले करणारे ‘अर्थब्रह्म’ वाचकांसाठी मार्गदर्शक ठरावे.

प्रकाशन सोहळा
कधी : शुक्रवार, २५ जुलै,  
सायं  ६.३० वाजता़
कुठे : स्वा़  सावरकर राष्ट्रीय स्मारक सभागृह, शिवाजी पार्क़
नवी मुंबईत : रविवार,२७ जुलै,सायं़  ६ वाजता़  मराठी साहित्य संस्कृती आणि कला मंडळ, सेक्टर ६, वाशी़
प्रवेश विनामूल्य़  प्रथम येणाऱ्यास प्राधान्य