निश्चलनीकरणामुळे उडालेली धूळ आता बसू लागली असून, अर्थव्यवस्थेच्या ‘कॅशलेस’ संक्रमणाची वारे सर्वत्र जोराने वाहू लागले आहेत. या रोकडरहित व्यवस्थेत गुंतवणुकीच्या पारंपरिक मार्गात काही बदल संभवतो काय की काही नवीन वाटा खुल्या होतील, अशा प्रश्नांची उकल रविवारी ठाण्यात ‘लोकसत्ता अर्थसल्ला’ उपक्रमातून केली जाणार आहे.

‘बिर्ला सन लाईफ म्युच्युअल फंड’ प्रस्तुत गुंतवणूकदार मार्गदर्शनाच्या ‘लोकसत्ता अर्थसल्ला’ उपक्रमाचे हे सत्र रविवार, २२ जानेवारी रोजी सकाळी १०.३० वाजता ठाण्यातील कांती विसारिया हॉल येथे आयोजित करण्यात आले आहे. नोटाबंदीतून साधल्या गेलेल्या आर्थिक परिणामांतून निर्माण झालेल्या कुटुंबाच्या अर्थनियोजन आणि गुंतवणुकीच्या समस्यांचे निराकरणाचा हा  प्रयत्न  आर्थिक साक्षरतेच्या उद्देशाने ‘लोकसत्ता’ राबवीत आहे.

 

गुंतवणुकीचा सध्याच्या सर्वात लोकप्रिय पर्याय म्युच्युअल फंडाबाबत बदललेल्या स्थितीत आपले धोरण कसे असावे, कोणत्या फंड प्रकारात सध्या गुंतवणूक उपयुक्त ठरेल आणि फंडांची निवड कोणत्या निकषावर करावी यावर या कार्यक्रमांत अर्थसल्लागार सुयोग काळे प्रकाश टाकतील. नोटाबंदीमुळे एकूण संभ्रमाची स्थिती असताना गुंतवणुकीचे धाडस करायचे तर कुठे, असा सर्वसामान्यांपुढे पेच आहे. सनदी लेखाकार तृप्ती राणे याच अंगाने या कार्यक्रमांत मांडणी करतील. बचत आणि गुंतवणूक ही निरंतर सुरू राहणारी प्रक्रिया आहे. आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर उत्पन्न, खर्च यांचा मेळ राखत आर्थिक नियोजनाची घडी यातून कशी बसवली जाऊ शकते हे त्या सोदाहरण पटवून देतील. तज्ज्ञ वक्त्यांना या कार्यक्रमांत गुंतवणूकविषयक प्रश्न विचारण्याची उपस्थितांना संधी मिळेल.

lok-chart