पारंपरिक वाहतूक व्यवस्थेत आमूलाग्र बदल करण्याचा मान्यवरांचा सूर
पायाभूत सुविधांमध्ये वाहतूक व्यवस्था हा अत्यंत महत्त्वाचा घटक असून या व्यवस्थेत आमूलाग्र बदल होण्याची गरज आहे. मात्र हे बदल आता अपारंपरिक ऊर्जास्रोत आणि विद्युत ऊर्जा या माध्यमातून व्हायला हवेत. विकासाचा मार्ग तंत्रज्ञानावाटेच जाणार असून त्याला पर्याय नाही, असा सूर ‘टीजेएसबी सहकारी बँक लिमिटेड’ प्रस्तुत ‘लोकसत्ता बदलता महाराष्ट्र’ या कार्यक्रमाच्या सत्रात मान्यवरांनी लावला. ‘पायाभूत सुविधांसाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर’ या विषयावर झालेल्या या चर्चासत्रात आयडीसीचे प्राध्यापक प्रा. किशोर मुन्शी, केपीआयटी टेक्नॉलॉजीचे सीटीओ अनुप साबळे आणि एम इंडिकेटर या लोकप्रिय अ‍ॅपचे संस्थापक सचिन टेके हे सहभागी झाले होते.

Untitled-51
अमेरिका आणि युरोपीय देशांमध्ये सध्या विद्युत ऊर्जेवर चालणाऱ्या खासगी गाडय़ा विकसित होत आहेत. विद्युत ऊर्जेवर चालणारी गाडी मुळापासूनच हलक्या वजनाची, जास्त अंतर धावेल अशी तयार करायला हवी. हे प्रयोग बससारख्या सार्वजनिक वाहतुकीच्या वाहनाच्या बाबतीतही करणे शक्य आहे, असे प्रतिपादन प्रा. मुन्शी यांनी मनोगतात केले.
आतापर्यंत आपण पूर्वानुभवावरून धडे घेत होतो. मात्र बदलत्या युगात हा पूर्वानुभव बाजूला सारून नवीन विचार करण्याची गरज आहे. गेल्या शतकात लागले नाहीत, एवढे शोध गेल्या २० वर्षांत लागले. मात्र या २० वर्षांत लागले नाही, एवढे शोध पुढील पाच वर्षांत लागणार आहेत, असे सांगत अनुप साबळे यांनी तंत्रज्ञानाचे महत्त्व अधोरेखित केले.
सचिन टेके यांनी वाहतूक व्यवस्था तयार झाल्यानंतर त्या व्यवस्थेची माहिती लोकांपर्यंत पोहोचणे किती महत्त्वाचे आहे, हे सांगितले. या व्यवस्थेची माहिती लोकांपर्यंत पोहोचली नाही, तर सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेकडे प्रवासी वळणार नाहीत. एम इंडिकेटरसारखी अ‍ॅप नेमके हेच काम करतात.
यापुढेही नवनवीन वैशिष्टय़े प्रवाशांसाठी उपलब्ध करून त्यांचा प्रवास सुखकर करण्याचा प्रयत्न होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.