विकासाचा सर्वकष विचारच आपल्याकडे होत नाही. तसे करणे हे एकमेकांच्या हितसंबंधांना बाधा आणणारे आहे असे आपल्याला वाटते. तेव्हा एकमेकांना मागे टाकत पुढे जाण्याच्या ईष्र्येत हा अपघात घडला असे म्हणून नागरिकांना दोष देण्याऐवजी आधी आपल्या धुरिणांनी हा व्यवस्थेतील बदल घडवायला हवा, असे मत ‘मी आणि माझे.’ या अग्रलेखात मांडण्यात आले होते. एल्फिन्स्टन पुलावरील चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेच्या विषयावर हा अग्रलेख आहे.

एल्फिन्स्टन पुलावरील अपघाताचा विचार करताना परळ भागाचा वेगाने विकास झाला, पण तेथे नव्याने सोयीसुविधा निर्माण केल्या नाहीत, याकडेही पाहावे लागेल. सातत्याने सुधारणा होत असतानाही आपल्याकडे सुधारणा होताना का दिसत नाहीत, या प्रश्नाचे  प्रामाणिक उत्तर आपल्या व्यवस्थेच्या बालिश हाताळणीत आहे. ते कसे हे समजून घ्यायचे असेल तर आधी आपल्याकडे समस्यांना मिळणारा प्रतिसाद कसा असतो आणि प्रत्यक्षात तो कसा असायला हवा, याची सविस्तर चर्चा व्हायला हवी. ती करायची कारण व्यवस्थेच्या आणि एकंदरीतच व्यवस्थानिर्मितीच्या याच बालिश हाताळणीमुळे एल्फिन्स्टन रोड स्थानकात २४ जणांचा केवळ चेंगराचेंगरीत मृत्यू झाला, असे विचार ‘मी आणि माझे.’ या अग्रलेखात व्यक्त करण्यात आले आहे. या अग्रलेखावर आपली भूमिका मांडत मुंबईच्या ग्रॅंट मेडिकल महाविद्यालयाचा विद्यार्थी संकेत काटकर हा ‘ब्लॉग बेंचर्स’च्या पहिल्या पारितोषिकाचा मानकरी ठरली आहे आणि के.के.वाघ इन्स्टिटय़ूट ऑफ इंजिनियरिंग एज्युकेशन अ‍ॅण्ड रिसर्चची विद्यार्थीनी स्नेहल परभट हिने दुसरे पारितोषिक पटकावले.

अग्रलेखावर मत मांडणाऱ्या संकेत काटकर आणि स्नेहल परभट यांनी दर्जेदार लेखन करत ‘ब्लॉग बेंचर्स’ स्पर्धेत बाजी मारली. संकेतला सात हजार आणि प्रमाणपत्र तर स्नेहलला पाच हजार  रुपये आणि प्रमाणपत्र असे बक्षीस देण्यात येणार आहे. या विद्यार्थ्यांना त्यांच्या महाविद्यालयांच्या प्राचार्याच्या हस्ते बक्षीस देऊन गौरविण्यात येईल. या अग्रलेखावर व्यक्त होताना राज्यभरातील अनेक महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी आपल्या विचारांना चालना देत उत्तम लेखन केले. महाविद्यालयीन युवा शक्तीच्या लेखणीला व्यासपीठ मिळवून देण्याच्या उद्देशाने सुरू केलेल्या या स्पर्धेला विद्यार्थी भरभरून प्रतिसाद देत आहेत. यात प्रत्येक आठवडय़ाच्या शुक्रवारी ‘आठवडय़ाचे संपादकीय’ या शीर्षकाखाली नवीन लेख प्रसिद्ध करण्यात येतो. त्यावर विद्यार्थ्यांना व्यक्त व्हायचे असते. त्यांना पुढील आठवडय़ाच्या गुरुवापर्यंतची मुदत दिली जाते.

विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या लेखांचे परीक्षण तज्ज्ञ परीक्षकांकडून केले जाते. त्यानंतर पहिल्या व दुसऱ्या क्रमांकाची बक्षिसे काढली जातात. पहिल्याच लेखापासून या स्पर्धेला विद्यार्थ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. विजेत्या विद्यार्थ्यांचे लेख ‘लोकसत्ता’मध्ये प्रसिद्ध केले जातात. ‘लोकसत्ता’च्या राज्यभरातील वाचकांना या निमित्ताने तरुणाईचे अंतरंग समजून घेण्याची संधी मिळते. या स्पर्धेत सहभागी होऊ  इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना indianexpress-loksatta.go-vip.net/Blogbenchers  या संकेतस्थळाला भेट देऊन आपली भूमिका मांडायची आहे.