निवडणुकीची रणधुमाळी संपलीय आणि आठवडाभरात दिवाळीचा जल्लोषही मावळू लागेल. पण तरुणाईच्या उत्साहाचे उधाण पुढील महिनाभर कायम राहणार आहे. कारण आहे ‘लोकसत्ता’च्या पुढाकाराने आणि ‘अस्तित्व’ संस्थेच्या माध्यमातून होणाऱ्या ‘लोकांकिका’ स्पर्धेचे. तरुणाईची सर्जनशीलतेला, कलागुणांना चालना देणारी ही एकांकिका स्पर्धा येत्या १८ नोव्हेंबरपासून सुरू होणार असून त्यासाठी तरुण लेखक-कलाकारांची तयारी सुरू आहे.
नाटकवेडय़ा महाविद्यालयीन तरुणांना राज्यव्यापी आणि दर्जेदार व्यासपीठ मिळवून देण्यासाठी आयोजित करण्यात आलेली ही एकांकिका स्पर्धा मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, नागपूर, औरंगाबाद, अहमदनगर आणि रत्नागिरी या आठ केंद्रांवर होणार आहे. तरुणांच्या सर्जनशीलतेला वाव देणे आणि नव्या गुणवंतांना महाराष्ट्रापुढे आणण्याचे एक व्यासपीठ या हेतूने ‘लोकांकिका’ हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे तरुणांच्या उत्साहाला-गुणवत्तेला परीक्षा, अभ्यास या गोष्टींचा अडथळा होणार नाही अशा कालावधीतच ही स्पर्धा भरवण्यात येत आहे. या स्पर्धेसाठी असलेली मुख्य अट म्हणजे महाविद्यालयांतर्फे सादर होणाऱ्या एकांकिका याआधी कोणत्याही स्पर्धेत सादर झालेल्या नसाव्यात. या स्पर्धेची प्रवेशिका आणि नियमावली ‘लोकसत्ता’च्या (indianexpress-loksatta.go-vip.net/lokankinka) संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
*या स्पर्धेच्या प्राथमिक आणि केंद्रीय अंतिम या दोन फेऱ्या होतील. प्रत्येक केंद्रावरील अंतिम फेरीतील विजेती एकांकिका महाअंतिम फेरीसाठी पात्र ठरेल.
*महाअंतिम फेरी मुंबईत होणार असून या आठ एकांकिकांमधून निवडली गेलेली एकांकिका ‘लोकांकिका’ ठरेल.
*प्राथमिक फेरीपासून ते महाअंतिम फेरीपर्यंत सर्वच प्रतिभावान कलाकारांवर ‘झी मराठी’ या वाहिनीचे लक्ष असेल. स्पर्धेदरम्यान रोख पारितोषिकांशिवाय ५० सन्मानचिन्हेही देण्यात येणार आहेत.